बेळगावातील ‘त्या’ एन्काउंटरची आठवण

बेळगावातील ‘त्या’ एन्काउंटरची आठवण

बेळगाव - हैदराबादमधील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियांका रेड्डी यांच्यावर अत्याचार करून निर्घृण खून करणाऱ्या चौघा संशयितांचा पोलिसांनी शुक्रवारी (ता. ६) पहाटे खात्मा केला. या घटनेमुळे मण्णूरमधील (ता. बेळगाव) शीतल चौगुले अत्याचार व खूनप्रकरणाची आठवण ताजी झाली आहे.

 हैदराबाद पोलिसांनी संशयितांना घटनास्थळीच संपविले. त्याचप्रमाणे शीतल चौगुले खून प्रकरणातील संशयित प्रवीण शिंत्रेचा अत्याचार केलेल्या घरातच पोलिसांनी खात्मा केला होता.
शीतल चौगुले अत्याचार व खून प्रकरणाने २००७ मध्ये संपूर्ण बेळगाव जिल्हा हादरला होता. या प्रकरणात पती रवींद्र चौगुले, त्याची प्रेयसी रिना ताशिलदारसह प्रवीण शिंत्रे, राजेश मेणसे, रणजित शिंत्रे, विजयानंद उर्फ डिंकु शिंदे, परशराम कांबळे यांच्यावर दोषारोप ठेवण्यात आले होते. पत्नी शीतलचा खात्मा करण्यासाठी पती रविंद्रनेच प्रवीण शिंत्रेला सुपारी दिल्याचा आरोप होता. त्यानुसार लक्ष्मीनगर, हिंडलगा येथील राजेश मेणसे याच्या राजदीप बंगल्यात अत्याचार करुन शीतलचा खून करण्यात आला. नंतर तिचा मृतदेह खानापूरच्या जंगलात नेऊन टाकण्यात आला होता. त्यावेळी, शीतलला न्याय मिळावा, यासाठी महिला संघटनांसह बेळगावकरांनी एकत्र येत आंदोलन छेडले होते. त्यासाठी राणी चन्नम्मा चौकात मोठ्या प्रमाणावर आंदोलन झाले होते.

शीतल चौगुले खून प्रकरणातील एन्काउंटरला उजाळा

प्रकरणातील मुख्य संशयित प्रवीण शिंत्रेला पोलिसांनी उडुपीतून अटक केली होती. त्याला बेळगावात आणून पोलिस बंगल्यावर ठेवले होते. गुन्हा कसा केला याची माहिती घेण्यासाठी पोलिस त्याला ५ सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजता राजदीप बंगल्यावर घटनास्थळी घेऊन गेले होते. मात्र, तिथे जाताच बंगल्यात लवपून ठेवलेल्या पिस्तूलमधून प्रवीणने पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. आत्मसंरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो ठार झाला होता. हैदराबाद प्रकरणातील संशयितांबाबतही असेच घडले आहे. पोलिसांनी संशयितांना घटनास्थळी नेले. पण, हल्ला करुन पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना सर्वजण ठार झाले. या घटनेमुळे शीतल चौगुले खून प्रकरणातील एन्काउंटरला उजाळा मिळाला आहे.

शीतल चौगुले घटनाक्रम 

  •  ११ ऑगस्ट २००७ : शीतल चौगुलेचा लक्ष्मीनगरमधील राजदीप बंगल्यावर अत्याचार करुन खून  १२ ऑगस्ट २००७ : शीतलचा मृतदेह जांबोटी रोडवरील कवळी नाल्यात टाकण्यात आला
  •  १३ ऑगस्ट २००७ : पती रवींद्र चौगुलेने पत्नी बेपत्ता झाल्याची फिर्याद काकती पोलिस स्थानकात नोंदवली 
  •  १३ ऑगस्ट २००७ : शीतलचा मृतदेह आढळला 
  •  २२ ऑगस्ट २००७ : पती रवींद्र चौगुलेसह दोघांना अटक
  •  ६ सप्टेंबर २००७ : प्रवीण शिंत्रेचे राजदीप बंगल्यावर एन्काउंटर
  •  ११ जून २०१२ : संशयितांना कोर्टाकडून जन्मठेपेची शिक्षा
  •  ८ सप्टेंबर २०१५ : उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात द्विसदस्यीय पीठाकडून पाचही संशयितांची निर्दोष मुक्तता
  •  २९ एप्रिल २०१६ : सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com