ओढ्यांवरील अतिक्रमणे सातारकरांसाठी बनले धाेकादायक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

 अजिंक्‍यतारा किल्ल्यावरून वाहत येणाऱ्या पाण्यासाठी केसरकर पेठेतून साधारण साडेपाच फुटांचा ओढा होता. मात्र, 70 वर्षांपासून पाहतोय, तर त्यावर अतिक्रमणे वाढतच आहेत. अतिपाऊस झाल्यास हेच पाणी अनेकांच्या घरांत घुसत आहे. 
- एक ज्येष्ठ नागरिक. 

सातारा : पुण्यात बुधवारी झालेल्या अतिवृष्टीने 12 जणांचा बळी गेला. ओढ्यांवरील मानवनिर्मित प्रचंड अतिक्रमणांमुळेही हा घात झाला. सातारा शहर व उपनगरांतही तशीच परिस्थिती असून, मोठमोठ्या ओढ्यांचे रूपांतर आता गटारांत झाले असून, बहुतांश ठिकाणी ओढे लुप्त झाले आहेत. तरीही प्रशासन त्याकडे डोळेझाक करत आहे. पुण्यासारखी घटना घडल्यानंतरच सर्वांचे डोळे उघडणार काय? असा प्रश्‍न आहे. 
 

निसर्गापुढे आपण अपुरे असल्याचे यावर्षीच्या पावसाने सातत्याने दाखवून दिले. कऱ्हाड, पाटण येथील महापूर, अतिवृष्टी, कोल्हापूर, सांगलीचा महापूर तसाच पुण्यातील घटनेने नैसर्गिक आपत्तीला मानवनिर्मित कारणेही तितकीच कारणीभूत असल्याचे समोर आले. कात्रज परिसरातील आंबिल ओढ्याचा तडाखा पुणेकरांसाठी अस्मानी संकट ठरले. अतिवृष्टीमुळे पूर आला असे नाही तर प्रशासन आणि नागरिकांनी ओढ्यांचे केलेले नुकसान हेही कारण ठरले आहेत. अवघ्या तीन तासांच्या पावसाने शेकडो कुटुंबीयांचे होत्याचे नव्हते झाले. तीव्रतेने कमी असला तरी तसाच अनुभव 2014 मध्ये सातारा शहराने घेतला होता. त्यावेळी अनेकांच्या घरांत पाणी घुसून नुकसान झाले होते. 

सातारा शहर अजिंक्‍यतारा किल्ल्याच्या, डोंगरउतारावर वसलेले आहे. तेथून प्रवाहित होणारे अनेक ओढे शहरातून गेले आहेत. सध्या या ओढ्यांच्या दुतर्फा बांधकामे झाली असून, अनेकांनी तर ओढ्यांवर इमारती उभ्या केल्या आहेत. ठिकठिकाणी काठावर भराव टाकले असून, सीमाभिंती बांधल्या आहेत. राडारोडा, कचरा ओढ्यांत टाकला असल्याने नैसर्गिक प्रवाह बदलले आहेत. जलस्त्रोत मुजले गेले आहेत. शहरातील सर्वच ओढ्यांची नैसर्गिक रचना बदलण्यात आली आहे. इमारती उभ्या आहेत. दोन्ही बाजूने भिंती बांधून ओढ्यांना बंदिस्त केले आहे. परिणामी, ओढ्यांची गटारे बनली आहेत. त्यामुळे मुसळधार पावसाचा ताण अरुंद ओढ्यांवर येऊन पाणी रस्त्यांवरून वाहू लागते. कचरा, सांडपाणी, राडारोडा, अतिक्रमणे यामुळे ओढ्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी झाली आहे. निसर्गाशी खेळ सुरू असून, साताऱ्यातही अतिवृष्टी झाली तर भयावह घटना घडू शकते. त्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनानेही सतर्क होऊन अतिक्रमणांवर हातोडा टाकला पाहिजे. 
 

अन्‌ झाले जलयम... ऑगस्ट 2014 मध्ये साताऱ्यात तासाभरात ढगफुटीसदृश सुमारे 82 मिलिमीटर इतका पाऊस झाला होता. त्यामुळे शाहूनगर, गोडोलीमध्ये अशरक्ष: दैना झाली होती. अनेकांच्या घरांत पाणी, तर गोडोली नाका येथे रस्त्यावर चार ते पाच फूट पाणी झाले होते. मात्र, त्यानंतर अतिक्रमणे करणाऱ्यांना नोटिसा देवून अथवा जुजबी कारवाई करून प्रशासनाने पुन्हा गांधारीची भूमिका घेतली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The encroachment is also a headache for satarkar