अतिक्रमण मोहीम ठरली नौटंकी; महापालिकेकडून मिरजेतील जप्त हातगाडे परत देण्याचे कारस्थान

The encroachment campaign turned out to be a gimmick; Conspiracy to return the handcarts confiscated from Miraj by the Municipal Corporation
The encroachment campaign turned out to be a gimmick; Conspiracy to return the handcarts confiscated from Miraj by the Municipal Corporation

मिरज : बराच गाजावाजा करीत महापालिकेने शहरात राबवलेली अतिक्रमण निर्मूलन मोहीम ही निव्वळ नौटंकी ठरली आहे. जप्त केलेले रस्त्यावरील हातगाडे परत देण्याचे कारस्थान महापालिकेतील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताने राजरोसपणे सुरू आहे. कोणत्याही दंड आकारणीविनाच आणि कारवाईविनाच हातगाड्यांचे मालक महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना दमबाजी करून आपल्या हातगाड्या परत घेऊन जात आहेत. हे सगळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मूक संमतीनेच सुरू आहे. 

महापालिकेच्यावतीने गेल्या आठवड्यात शुक्रवारी (ता.18) महापालिकेने शहरात रस्त्याकडेस बंद पडलेली चार चाकी वाहने आणि हातगाड्या निर्मूलनाची मोठी मोहीम राबविली. यावेळी महापालिकेने बराच डामडौल करीत शहरातील शेकडो गाड्या जप्त केल्या. यामध्ये हातगाडी व्यावसायिकांनाही महापालिका प्रशासनाने आपले प्रमुख लक्ष्य बनवले आणि त्यांच्या मोठ्या गाड्या जप्त करून बालगंधर्व नाट्यगृहाच्या आवारात आणून टाकल्या. केवळ पाच ते सहा दिवसांनी या हातगाड्या संबंधित हातगाडी चालकांनी मालकांनी ट्रक टेंपो मधून घेऊन जाण्यास सुरवात केली आहे. यासाठी महापालिकेने कोणत्याही प्रकारचा दंड संबंधित हातगाडी चालकांकडून वसूल केला नसल्याचे सांगण्यात आले. शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये मोक्‍याच्या जागांवर हातगाडे लावणाऱ्यांचे एक टोळके सक्रिय आहे. 

यापैकी काहीजण खासगी सावकारीशी संबंधित आहेत. या टोळक्‍याकडून काही गरजू व्यावसायिकांना हातगाडे भाड्याने दिले जातात. महापालिकेची जागा आणि हातगाडा याचे पुरेपूर भाडे हे टोळके संबंधित हातगाडी चालकाकडून वसूल करते. याच टोळक्‍यातील काही हातगाडे कारवाईवेळी जप्त झाले. आणि नेमके हेच टोळके आता आपले हातगाडे परत उचलून नेत आहेत. त्यामुळे या हातगाडी चालकांचे महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निश्‍चित साटेलोटे असल्याचा संशय निर्माण झाला आहे. 
एकीकडे कारवाईचे नाटक वटवायचे आणि दुसरीकडे अशाप्रकारे नागरिकांची दिशाभूल करायची या फसव्या कारभारामुळेच शहरातील सर्व रस्ते आणि फुटपाथ सध्या हातगाडी चालकानी गिळंकृत केले आहेत. 
 

याबाबत रोखठोकपणे जाब विचारण्याशिवाय पर्याय नाही

पालिकेसारखी यंत्रणा नागरिकांची एवढ्या धडधडीतपणे एवढी फसवणूक करते, नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करते तरीही आपण मूग गिळून गप्प बसतो. हा आपला दोष आहे. वेळोवेळी माहिती अधिकाराच्या माध्यमातून अथवा आपण निवडून दिलेल्या सदस्यांना याबाबत रोखठोकपणे जाब विचारण्याशिवाय पर्याय नाही. 
- अरुण यादव, विजापूर वेस, मिरज 

जबाबदार अधिकाऱ्याविरुद्ध निश्‍चित कारवाई

पालिकेने जप्त केलेले हातगाडे कोणत्याही दंडात्मक कारवाईविना परत दिले गेले असतील तर ही बाब अतिशय गंभीर आहे. याबाबत सखोल माहिती घेऊन संबंधित जबाबदार अधिकाऱ्याविरुद्ध निश्‍चित कारवाई केली जाईल. 
- नितीन कापडणीस, आयुक्त, सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका 

संपादन : युवराज यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com