मिरजेत अतिक्रमण निर्मूलन मोहीम; हल्ल्यानंतर पालिका आक्रमक

प्रमोद जेरे
Friday, 25 September 2020

सांगली महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहीमेवेळी बुधवारी (ता. 23) सायंकाळी हल्ला होताच आज (गुरुवारी) महापालिकेने शहरात आक्रमकपणे अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली.

मिरज (जि. सांगली) : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहीमेवेळी बुधवारी (ता. 23) सायंकाळी हल्ला होताच आज (गुरुवारी) महापालिकेने शहरात आक्रमकपणे अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली. यामध्ये बावन्न ठिकाणची अतिक्रमणे महापालिकेने काढून टाकली. यावेळीही रस्त्यावरील विक्रेत्यांची या पथकाशी वादावादी झाली. प्रचंड पोलिस बंदोबस्तात ही कारवाई झाली. 

बुधवारी (ता. 23) सायंकाळी शहरातील किसान चौक परिसरात महापालिकेचे सहाय्यक आयुक्त गायकवाड यांच्यावर फळ विक्रेत्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महापालिकेच्या अन्य कर्मचाऱ्यांनाही मारहाण करून एकाचा गळा घोटण्याचा प्रयत्न झाला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. 

या घटनेनंतर महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी तातडीने मिरजमधील सर्व प्रमुख रस्त्यांवर असलेली अतिक्रमणे काढण्याचे आदेश महापालिकेच्या मिरज कार्यालयात दिले. या आदेशास अनुसरून आज प्रचंड पोलिस बंदोबस्तामध्ये महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या शेकडो कर्मचाऱ्यांनी अत्यंत आक्रमकपणे शहरातील 52 प्रमुख अतिक्रमणे काढून टाकली. याशिवाय शेकडो हातगाडे आणि फूटपाथवरील साहित्य जप्त केले. या कारवाईवेळीही रस्त्यावरील व्यावसायिक आक्रमक झाले होते; परंतु पोलिसांचा फौजफाटा आणि महापालिका कर्मचाऱ्यांची संख्या पाहून अतिक्रमणधारकांची डाळ शिजली नाही. सकाळी दहा वाजल्यापासून या कारवाईस प्रारंभ झाला. सायंकाळी उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. या कारवाईमुळे किरकोळ भाजी विक्रेत्या महिला आणि शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले. 

आज दिवसभरात शहरामध्ये एकही फेरीवाला रस्त्यावर दिसला नाही. किसान चौक ते गाढवे चौक आणि लक्ष्मी मार्केट ते गणेश तलावापर्यंतचा पूर्ण रस्ता अतिक्रमणमुक्त झाला. या कारवाईची शहरात जोरदार चर्चा सुरू झाली; परंतु महापालिकेचा हा उत्साह किती दिवस राहणार याबाबतही सामान्य नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. 

हल्लेखोर फेरीवाल्यांविरुद्ध कठोर कारवाई

हल्लेखोर फेरीवाल्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे महापालिका प्रशासनाचे नियोजन आहे. त्यामुळे यापुढे बेकायदेशीरपणे रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांनी महापालिकेचा कर्मचारी अथवा अधिकाऱ्यांशी वाद घालण्यासह त्यांच्यावर शारीरिक दुखापत होईल असा हल्ला करणे गंभीर समजून त्यांच्याविरुद्ध फौजदारी संहितेप्रमाणे कारवाई करण्यात येईल. 
- स्मृती पाटील, उपायुक्त, महापालिका कार्यालय, मिरज. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: encroachment eradication campaign in Miraj; The municipality is aggressive after the attack