esakal | कर्‍हाडला कुंपनच खाते शेत... 
sakal

बोलून बातमी शोधा

The Encroachment On The Sidewalk Increased

नियमाला डावलून विक्रेते रस्त्यावर बसतात. पालिका किंवा पालिकेचे अधिकारी त्यावर कारवाई करू शकत नाहीत. कारण त्या हातगाड्यांवर मेहेरबानांची मेहेरनजर आहे. परिणामी वाहतूक कोंडी वाढत चालली आहे. त्याशिवाय हॉकर्स झोन नसल्याने वाढत्या विक्रेत्यांवर पालिकाही कारवाई करता येईना, अशी पालिकेची अवस्‍था बनली आहे. 

कर्‍हाडला कुंपनच खाते शेत... 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : शहरातील अनेक चौकांत पालिकेच्या पदाधिकाऱ्यांची नावे घेऊन हातगाडे लावले जात आहेत. त्या हातगाड्यांवर कारवाई करायचीच झाली तर कर्मचाऱ्यांना त्या "मेहेरबान'नांची भीती दाखवली जाते. त्यामुळे हातगाड्यावरील कारवाई, त्यांच्या नोंदी घेण्याचा खेळ कागदावरच रंगत आहे. शहरात हातगाड्यांची माहिती घेण्याचे काम पालिकेने हाती घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र, 2001 नंतर अधिकृत आकडेवारी पालिकेकडे उपलब्ध नाही. त्यामुळेच हॉकर्स झोनचा प्रश्न प्रलंबित आहे. मध्यंतरी हातगाडाधारक संघटनेला अधिकाऱ्यांनी हॉकर्स झोन करण्याचा प्रस्ताव दिला. मात्र, नागरिकांसह पदाधिकाऱ्यांनी त्याला खो घातल्याने तो प्रस्ताव गुंडाळला गेला आहे. 

हे वाचा : दीड वर्षातच भाजपने एवढे काही गमावले की... 

शहराच्या सौंदर्यात बाधा ठरणारी अतिक्रमणे अद्यापही रस्त्यावर जशीच्या तशीच आहेत. त्यामुळे पालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षणाला त्याची बाधा येत आहे. कृष्णा नाका ते बस स्थानक परिसरातील अतिक्रमण हटवण्याची मोहीम पालिकेने काही कालावधीसाठी हाती घेतली. मात्र, ती आजअखेर बारगळलेलीच आहे. त्यामुळे शहरातील हातगाड्यांसह रस्त्यावर बसून साहित्य विकणाऱ्यांची गर्दी वाढत आहे. हातगाड्यांसह रस्त्यावर बसून विक्रीस बंदी आहे. मात्र, पालिका शहरात हॉकर्स झोन करत नसल्याने त्यांच्यावर ती वेळ आली आहे.

पालिका हॉकर्स झोनच्या मुद्यावर 2001 पासून केवळ कागदोपत्रीच घोडी नाचवली जात आहेत. कधी संघटना, कधी पदाधिकारी तर कधी नागरीक त्याला खो घालत आहेत. त्यामुळे हॉकर्स झोनचा प्रश्न रेंगाळला आहे. उच्च न्यायालयाने त्यासाठी अटींसह मार्गदर्शक तत्त्वेही ठरवली आहेत. मात्र, तरीही हॉकर्स झोनबाबत निर्णय घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. परिणामी शहरातील मुख्य बाजारपेठ, दत्त चौक, संगम पेट्रोल पंप, आझाद चौक, मारुती मंदिर चौक, नेहरू चौक, महात्मा गांधी पुतळ्यासह कृष्णा घाटावरही विक्रेत्यांची संख्या वाढली आहे. तेथे बंदी असलेल्या नियमाला डावलून विक्रेते रस्त्यावर बसतात.

हेही वाचा : पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुतेंवर कारवाई ? 

पालिका किंवा पालिकेचे अधिकारी त्यावर कारवाई करू शकत नाहीत. कारण त्या हातगाड्यांवर मेहेरबानांची मेहेरनजर आहे. परिणामी वाहतूक कोंडी वाढत चालली आहे. त्याशिवाय हॉकर्स झोन नसल्याने वाढत्या विक्रेत्यांवर पालिकाही कारवाई करू शकत नाही. येथील हॉकर्स संघटनेने पालिकेने हॉकर्स झोन आखून द्यावा, यासाठी आक्रमक भूमिका घेतली. त्यासाठी दिवसभर ठिय्या झाले. मात्र, आजअखेर त्यातून काहीही फलित नाही. 

आवश्‍‍य वाचा : कोयनानगर, पाटणला भूकंपाचा धक्का 


...अशी आहे वस्तुस्थिती 

कऱ्हाडच्या हॉकर्स झोन प्रश्न 2001 पासून अधांतरी 
बाजारपेठेसह चौका-चौकात विक्रेते, हातगाडे वाढले 
पालिकेच्या प्रस्तावाला नागरिक, पदाधिकाऱ्यांचा खो 
हाकर्स झोन ठरविण्याची संधी असूनही होतेय दुर्लक्ष 
हातगाडेधारक संघटनेची आक्रमकता झाली कमी 

 

loading image
go to top