...म्हणून अतिक्रमण कारवाईत हवालदाराने लावली जीवाची बाजी

हेमंत पवार
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

कऱ्हाड शहरातील अतिक्रमणावर आज (बुधवार) पालिकेने हातोडा टाकला. त्यामध्ये प्रामुख्याने दत्त चौक ते विजय दिवस चौकादरम्यानची अतिक्रमणे हटवण्यात आली.

कऱ्हाड : पालिकेने आज शहरातील बसस्थानकासमोरील अतिक्रमणे हटवली. त्याच्याच कोपऱ्यावर राज मेडीकल समोर पोलिस चौकी उभारण्यात आली होती. ती अतिक्रमणात असल्याने तीही हटवण्यात आली. त्या चौकीवर जेसीबी फिरवला जात असतानाच हवालदार विवेक गोवारकर यांच्या चौकीत जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचा फोटो असल्याचे लक्षात आले. जेसीबी सुरु असतानाच त्यांनी तो फोटो काढण्यसाठी चौकीत धाव घेतली. जेसीबी सुरु असतानाच ते चौकीत धावल्याने अचानक तेथे दंगा झाला. मात्र ते फोटो घेवुन बाहेर आल्यानंतर अधिकाऱ्यांसह सर्वांनीच त्यांच्या यशवंत प्रेमाचे कौतुक केले.

कऱ्हाड शहरातील अतिक्रमणावर आज (बुधवार) पालिकेने हातोडा टाकला. त्यामध्ये प्रामुख्याने दत्त चौक ते विजय दिवस चौकादरम्यानची अतिक्रमणे हटवण्यात आली. कर्मवीर भाऊराव पाटील पुतळ्यापासुन अतिक्रमण हटवत पालिकेचे कर्मचारी राज मेडीकल समोरील पोलिस चौकीपर्यंत आले. तेथे आल्यावर चौकीही अतिक्रमणात असल्याचे स्पष्ट झाल्यावर पोलिस अधिकाऱ्यांच्या समोरच ती चौकी जेसीबीच्या सहाय्याने पाडण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली. जेसीबीने चौकी पाडण्यास सुरुवात केल्यावर तेथे बंदोबस्तासाठी तैनात असलेले हवालदार गोवारकर यांना चौकीत जेष्ठ नेते चव्हाण यांचा फोटो असल्याचे लक्षात आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्या चौकीत घुसुन आतील चव्हाण यांचा फोटो बाहेर आणला. काम सुरु असतानाच अचानक पोलिस कर्मचारी चौकीत गेल्याने सर्वांनीच आरडाओरडा केला. त्याचबरोबर ते आत का गेले ? याची उत्सुकता लागली होती. काही वेळातच गोवारकर श्री. चव्हाण यांचा फोटो घेवुन बाहेर आले. त्यानंतर ते पडणाऱ्या चौकीत का धावले याचा उलगडा झाला. त्यांच्या बारीक नजरेने यशवंतराव चव्हाण यांचा फोटो वाचल्याने उपस्थित अधिकाऱ्यांसह सर्वांनीच त्यांच्या यशवंत प्रेमाचे कौतुक केले.

हेही वाचा : Video : जेव्हा पाेलिस धावून येतात पालिकेच्या मदतीला

वाचा : मराठी राजभाषादिना निमित्त उद्या फलटणला राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन 

बसस्थानकासमोरील पोलिस चौकी पाडताना त्यामध्ये मला जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचा फोटो असल्याचे दिसले. त्यामुळे मी लगेचच चौकी पडत असतानाचा फोटो काढण्यासाठी धाव घेवुन चौकीबाहेर तो फोटो काढला. त्यानंतर काही वेळातच चौकी पडली.

विवेक गोवारकर हवालदार, कऱ्हाड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Encroachment Removed In Karad City By Muncipal Council