अभियंत्यांनी पालटले ज्ञानमंदिराचे रुप...सोयी-सुविधांसाठी सुमारे 40 लाखांचा खर्च

अजित कुलकर्णी
Tuesday, 7 July 2020

सांगली-  गतवर्षीच्या महापुरात कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील शाळेचे अपरिमित नुकसान झाले. अगोदरच शैक्षणिक सुविधांची कमतरता असणाऱ्या प्राथमिक शाळेचे महापुराने होत्याचे नव्हते केले. पण वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी सुमारे 40 लाख रुपये खर्चून शाळेचा "मेकओव्हर' केला. अभियंता असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी पूरग्रस्त शाळेला संघटन करुन उभारी देत दातृत्वासह विधायक कार्याचा जणू वस्तुपाठच घालून दिला आहे. 

सांगली-  गतवर्षीच्या महापुरात कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील शाळेचे अपरिमित नुकसान झाले. अगोदरच शैक्षणिक सुविधांची कमतरता असणाऱ्या प्राथमिक शाळेचे महापुराने होत्याचे नव्हते केले. पण वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी सुमारे 40 लाख रुपये खर्चून शाळेचा "मेकओव्हर' केला. अभियंता असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी पूरग्रस्त शाळेला संघटन करुन उभारी देत दातृत्वासह विधायक कार्याचा जणू वस्तुपाठच घालून दिला आहे. 

पूरग्रस्त भागात संपूर्ण देशभरातून मदतीचे हात येत होते. त्याप्रमाणे पीव्हीपीआयटीच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्पंदन प्रतिष्ठाननेही शालेय साहित्य वाटण्यासाठी पूरग्रस्त कसबे डिग्रज शाळेकडे धाव घेतली. शालेय साहित्य, सतरंज्या, वह्यापुस्तके वाटली. पण झालेले नुकसान पाहता ही मदत अत्यंत तोकडी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. शाळेत पुरेशी स्वच्छतागृहे नसल्याने रांग लावून होणारी विद्यार्थ्यांची गैरसोय पाहून मन विषण्ण झाले.

स्पंदन प्रतिष्ठानचे डॉ. हेमंत मोरे, पुण्यातील प्रसिध्द बिल्डर तेजराज पाटील, महेश ओझा, म्हाडाचे अभियंता अनिल अंकलगी, कोल्हापूरचे विक्रम ठाणेदार, सुनील गरडे, प्रसन्न कुलकर्णी, संजीव व्होरा, इंद्रजीत पाटील, प्रशांत शहा यांच्यासह त्यांचे स्थानिक मित्र पुणेस्थित अभियंता उदय चव्हाण यांनी शाळेचे रुपडे पालटण्याचा निश्‍चय केला. त्यानुसार चेतन चोपडे यांनी नुकसानीचे सर्वेक्षण केले. खर्च किती होणार याची गणतीच नव्हती. पण सगळ्यांनी हातभार लावल्याने कामाला मूर्त स्वरुप येत गेले. 
टाळेबंदीमुळे नूतनीकृत अंगणवाडी लोकार्पणाचा छोटेखानी समारंभ झाला. सोशल डिस्टनिंसगचे महत्व सांगून मास्क वाटप करण्यात आले. गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) उपाधीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्याहस्ते व उद्योजक समीर गाडगीळ, पं. स. सदस्य अजयसिंह चव्हाण, रोटरी क्‍लबचे अध्यक्ष अजय शहा, सेक्रेटरी डॉ. भास्कर ताम्हनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. 

दानशुरांच्या हातांनी ज्ञानमंदिर सजले 
तेजराज पाटील यांच्या मराठा आंत्रपिनर्स संस्थेतर्फे 20 लाख, रोटरी पुणे हेरिटेजतर्फे प्रमुख महेश ओझा यांनी 5 लाख यांच्यासह परदेशात असणाऱ्या स्पंदन ग्रुपच्या सदस्यांचा मदतीचा हात या कामासाठी लागला आहे.रंगरंगोटी, डागडुजी या गोष्टी झाल्याच; शिवाय अद्ययावत 30 स्वच्छतागृहे, 4 शौचालये, 2 स्नानगृहे उभारली आहेत. कीचनसह 3 अंगणवाड्यांचे नूतनीकरण व दुरुस्ती केली आहे. एकूण 16 अंगणवाड्या, 2 प्राथमिक शाळा, एक हायस्कूल असा पसारा असणाऱ्या गावात माजी विद्यार्थ्यांनी केलेले हे कार्य शाश्‍वत बनले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Engineers changed the look of Gyanmandir . Expenditure of around Rs. 40 lakhs for facilities