किल्ले मच्छिंद्रगड परिसरात पळवाटेने जिल्ह्यात प्रवेश 

शिवकुमार पाटील 
Wednesday, 22 July 2020

किल्लेमच्छिंद्रगड (ता. वाळवा) गांवच्या हद्दीतील पाणंद रस्ते, गाडीवाटा बाहेरुन येणाऱ्या शहरवासीयांना सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करण्याचा राजमार्ग झाला आहे.

किल्लेमच्छिंद्रगड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने हजाराचा आकडा पार केला आहे. परिस्थिती आवाक्‍याबाहेर जावू नये यासाठी प्रशासकीय, सुरक्षा यंत्रणा जीवाचे रान करीत आहेत. मात्र संपुर्ण व्यवस्थेस चकवा देण्यासाठी सांगली-सातारा सीमेवर असलेल्या किल्लेमच्छिंद्रगड (ता. वाळवा) गांवच्या हद्दीतील पाणंद रस्ते, गाडीवाटा बाहेरुन येणाऱ्या शहरवासीयांना सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करण्याचा राजमार्ग झाला आहे. येथील वाटा पळवाटा वेळीच अडविणे गरजेचे बनले आहे. 

कराड-तासगांव रोडवर सातारा, सांगली जिल्ह्याच्या सीमेवर गडखिंडीत पोलिसांचा सतत जागता पहारा आहे. पण पोलिसांना हुलकावण्या देवून गांवच्या उत्तरेकडील भागातील शेणोली (ता. कऱ्हाड) गावहद्दीस लागून असलेल्या सय्यद मळ्यापासून येणाऱ्या पाणंद रस्त्याने तसेच जुळेवाडी येथे असलेल्या नंदीवाले समाजापासून गावात येणाऱ्या रस्त्याने लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या नागरीकांचा दुचाकी, चारचाकी वाहनाने प्रवेश होत आहे. एकदा गावात आले की पुन्हा पोलिसांशी संबंध येत नाही. सध्या ज्याठिकाणी चेकनाका आहे तिथून या वाटा कोसभर दुर असल्याने पोलिसांची नजरही पडत नाही. त्यामुळे मुंबई, पुणे, सातारा आदी शहरी भागातून येणाऱ्यांचा सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात अलगद प्रवेश होत आहे. '

जुळेवाडी हे गांव सातारा, सांगली जिल्ह्याच्या सीमेवर आहे. गावातील निम्मे नागरीक कऱ्हाड तालुक्‍यातील तर निम्मे वाळवा तालुक्‍यातील मतदार असून ते किल्लेमच्छिंद्रगडचे नागरीक, रहिवाशीही आहेत. कऱ्हाडहून येताना जुळेवाडीत आल्यानंतर तसेच कऱ्हाड तालुक्‍यातील खुबी गांवापासून नरसिंहपूरमध्ये प्रवेशल्यानंतर जिल्ह्यात सहजच घुसता येते. नेमक्‍या याच त्रुटीमुळे अनेकांकडून लॉकडाऊनच्या नियमांची पायमल्ली होत आहे. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Entry into the district through the Machhindragarh fort