
सांगली : महापालिकेच्या निष्ठूर यंत्रणेनं आज पुन्हा एक झाड तोडलं. हाती असलेली मशीन अशी काही चालवली की, क्षणात ते झाड जमिनीवर कोसळलं. ते कोसळताना केवळ झाडाचा जीव गेला नाही, सोबत त्यावरील घरटंही जमिनीवर कोसळलं आणि त्यातील पक्ष्यांचा अत्यंत करुण अंत झाला. पिलांनी आसमंत उंच उडावं, खेळावं, बागडावं, यासाठी धडपडणाऱ्या आईनंही मान टाकली. सामान्यांच्या तळपायाची आग मस्तकाला जावी, असा हा प्रकार ती निष्ठूर यंत्रणा ‘याला काय होतंय’ अशा आविर्भावात पाहत राहिली. प्राणिमित्रांनी ‘पोस्ट’ टाकून निषेध नोंदवला आहे. सारे उद्यापासून पुन्हा कामाला लागतील. पुन्हा नवी झाडे तोडतील, पुन्हा पक्षी मरतील. मुर्दाड यंत्रणेला फरक पडणार नाही. इथं माणसं मेली तरी जाग येत नाही, त्यांच्या लेखी पक्ष्यांची काही किंमत असेल?