पॅकेजची कोविड सेंटर उभारली, सर्वसामान्यांचे काय; तासगावकरांचा सवाल

रवींद्र माने
Saturday, 12 September 2020

प्रशासनाने पेड कोविड हॉस्पिटल उभारली पण सर्वसामान्य रुग्णांचे काय? तासगाव ग्रामीण रुग्णालयात केवळ 29 ऑक्‍सिजन बेड आहेत. व्हेंटिलेटर तासगावला मिळालीच नाहीत. 

तासगाव (जि. सांगली ) : तासगाव तालुक्‍यात आता कोरोनाग्रस्तांची संख्या 1 हजारावर पोहोचली आहे. येत्या काळात आणखी वाढ होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पेड कोविड हॉस्पिटल उभारली पण सर्वसामान्य रुग्णांचे काय? तासगाव ग्रामीण रुग्णालयात केवळ 29 ऑक्‍सिजन बेड आहेत. व्हेंटिलेटर तासगावला मिळालीच नाहीत. 

तासगाव तालुक्‍यात आतापर्यंत सुमारे एक हजार कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी 55 रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. कोरोना रुगणांची वाढती संख्या थोपवायची कशी? बेड मिळत नाहीत यांच्यावर मार्ग काय काढायचा? तर प्रशासनाने नामी शक्कल लढवत कोविड सेंटर उभारणीला कौल देत तालुक्‍यात दोन पेड कोविड सेंटर उभारली आहेत. त्यामध्ये सद्या 82 बेड उपलब्ध झाले आहेत एका सेंटर मध्ये 7 एच एफ एन ओ व्हेंटिलेटर तर दुसऱ्या कोविड सेंटर वर केवळ 2 एच एन फ ओ व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. येथे ऑक्‍सिजन बेड आहेत पण ऑक्‍सिजनचा मोठा तुटवडा असल्याने या हॉस्पिटलमध्ये रुग्ण दाखल करून घेण्यास टाळले जात आहे. 

तासगाव तालुक्‍यात 71 गावे आहेत प्रत्येक गावातून एक दिवशी 1 रुग्ण कोरोना रुग्ण जरी निष्पन्न झाला तरी केवळ उपचारासाठी दाखल करणेही अवघड होणार आहे व्हेंटिलेटर लावणे आणि ओक्‍सिजन लावणे या गोष्टी दूरच आहेत. ज्या सुविधा आहेत त्या बहुतांशी "पेड" स्वरूपाच्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य रुग्णांना सुविधा मिळण्यासाठी सार्वजनिक आरोग्य केंद्रामध्ये तातडीने व्हेंटिलेटर आणि ऑक्‍सिजन सुविधा देण्याची मागणी होत आहे. 

एम डी डॉक्‍टर नाही... 
तासगाव ग्रामीण रुग्णालयात एम डी मेडिसिन डॉक्‍टर उपलब्ध नसल्याने तासगाव ला व्हेंटिलेटर जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले नाहीत. त्यामुळे सद्या ग्रामीण रुग्णालयात केवळ 29 ऑक्‍सिजन बेड उपलब्ध आहेत. एक ही एचएनफओ व्हेंटिलेटर सद्या शासकीय यंत्रणेकडे नाही. त्यामुळे व्हेंटिलेटरसाठी पेशंटला खाजगी पेड सर्व्हिस शिवाय पर्याय नाही. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Erected a covid center of the package, what of the commoners; Tasgaonkar's asks