जिल्ह्यात खंडणीविरोधी पथकाची स्थापना...अधीक्षक सुहैल शर्मा यांचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

सांगली-  वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्‍टर तसेच हॉटेल व्यवसायिक, सराफ, बांधकाम व्यावसायिक, उद्योजक यांच्याकडून खंडणी उकळणाऱ्यांना चाप लावण्यासाठी जिल्ह्यात खंडणीविरोधी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. "एलसीबी' च्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथक कार्यरत राहणार आहे. पथकात एक पोलिस अधिकारी व पाच कर्मचारी यांचा समावेश आहे. पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी या पथकाची स्थापना केली आहे. 

सांगली-  वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्‍टर तसेच हॉटेल व्यवसायिक, सराफ, बांधकाम व्यावसायिक, उद्योजक यांच्याकडून खंडणी उकळणाऱ्यांना चाप लावण्यासाठी जिल्ह्यात खंडणीविरोधी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. "एलसीबी' च्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथक कार्यरत राहणार आहे. पथकात एक पोलिस अधिकारी व पाच कर्मचारी यांचा समावेश आहे. पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी या पथकाची स्थापना केली आहे. 

सांगली-मिरज शहरात वैद्यकीय क्षेत्रात अनेक उच्च विद्याविभुषीत डॉक्‍टर्स व्यवसाय करत आहेत. मिरजेला वैद्यकीय पंढरी तसेच मेडिकल हब म्हणून ओळखले जाते. इथल्या डॉक्‍टरांनी वैद्यकीय पंढरीचा नावलौकीक वाढवला आहे. त्यामुळे राज्यातून तसेच राज्याबाहेरून देखील येथे रूग्ण उपचारासाठी येतात. मात्र या वैद्यकीय पंढरीला खंडणीबहाद्दरांचे ग्रहण लागले आहे. अनेक खंडणीबहाद्दर डॉक्‍टरांना खंडणी मागून लुबाडत असल्याची प्रकरणे पुढे येत आहेत. एखाद्या रूग्णाची तक्रार असल्यास ती सोडवण्याऐवजी डॉक्‍टरांना धमकावून खंडणी उकळतात. गुंड प्रवृत्तीचे लोक डॉक्‍टरांना खंडणी मागत असल्याच्या तक्रारी अलिकडच्या काळात वाढत आहेत. काही डॉक्‍टर यापूर्वी गुंडाच्या धमकीला बळी पडले आहेत. 

इंडियन मेडिकल असोसिएशनकडे खंडणीबाबतच्या तक्रारी डॉक्‍टर्स करत आहेत. संघटनेने पोलिस अधीक्षक शर्मा यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर अधीक्षक शर्मा यांनी तातडीने खंडणीविरोधी पथक स्थापन करण्याचे आदेश एलसीबीच्या पथकास दिले. डॉक्‍टरांकडून खंडणी उकळणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याबरोबरच हे पथक व्यापारी, हॉटेल व्यवसायिक, सराफ, बांधकाम व्यवसायिक, उद्योजक यांच्याकडे खंडणी मागणाऱ्यांवर देखील कारवाई करेल. 

खंडणीविरोधी पथक लवकरच मेडिकल असोसिएशन तसेच इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना भेट देईल. तसेच वैयक्तिक संपर्क साधेल. जे कोणी गुंड खंडणीसाठी त्रास देत असतील तर त्याची माहिती घेतील. गुंडाची चौकशी करून तत्काळ कारवाई देखील करेल. पथकामध्ये एक अधिकारी व पाच कर्मचारी असतील. पथकाचे कार्यक्षेत्र जिल्हाभर असेल. जिल्ह्यातील सर्व खंडणीची प्रकरणे या पथकाकडून तपासली जातील. खंडणीबहाद्दरांची गोपनीय माहिती एकत्रित करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल. जिल्ह्यातील प्रतिष्ठीत डॉक्‍टर, व्यापारी, बांधकाम व्यवसायिक, उद्योजक यांना कोणी खंडणीसाठी धमकावत असेल तर दूरध्वनी 0233- 2672850 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Establishment of anti-ransom squad in the district . Order of Superintendent Suhail Sharma