
कार्बोरेटर उघडून पाहिल्यास आतामध्ये स्पष्टपणे निळसर हिरवट रंगाची जेली दिसते. ती सहजासहजी स्वच्छ होत नाही.
इथेनॉलचा फटका; वाहनांच्या कार्बोरेटर बिघडण्याच्या तक्रारीत वाढ
सांगली : थांबून राहिलेल्या वाहनांचे कार्बोरेटर खराब होण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. वाहन दुरुस्ती करणाऱ्या मेस्त्री चालकांच्या मते हा इंधनातील इथेनॉलच्या मिश्रणाचे प्रमाण वाढवल्याने आहे; तर सध्याच्या पावसाळ्यात इंधन पाण्याच्या संपर्कात आल्याने या तक्रारी आल्याचेही म्हणणे आहे.
डिझेल किंवा पेट्रोलवरील सर्वच वाहनांबाबत अशा स्वरुपाच्या तक्रारी आहेत. विशेषतः जे वाहन आठ दिवसांपेक्षा अधिक काळ थांबून राहिले आहे, तसेच त्याचा कार्बोरेटर जुना आहे, अशा वाहनांबाबत ही तक्रार प्राधान्याने जाणवत आहे. यात कार्बोरेटरमधून इंजिनला पुरवठा होणाऱ्या इंधनच्या फिल्टरमध्ये हिरव्या रंगाची जेली तयार होत आहे. केसाच्या आकाराच्या छिंद्रामधून इंधन पार होत असते. तयार झालेल्या जेलीमुळे फिल्टर चॉकअप होत असल्याची तक्रार आहे.
कार्बोरेटर उघडून पाहिल्यास आतामध्ये स्पष्टपणे निळसर हिरवट रंगाची जेली दिसते. ती सहजासहजी स्वच्छ होत नाही. पेट्रोलने स्वच्छ करायचा प्रयत्नही पुरेसा ठरत नाही. नव्याने कार्बोरेटर टाकायचे तर वाहनांच्या प्रकारानुसार काही हजारांत त्याचा दर आहे. त्यामुळे मेस्त्री आणि वाहनचालकांमध्येच तक्रारी होत आहेत. महिन्याभरात दोन-दोनदा कार्बोरेटर खोलण्याची वेळ आलेले वाहनचालक आहेत.
"गेल्या महिन्याभरात किमान वीस वाहनांबाबत ही समान तक्रार आहे. आमच्या संघटनेच्या अनेक सदस्यांनीही अशी माहिती दिली आहे. इथेनॉल आधीपासून मिश्रण होत आहे. तक्रारी आत्ताच का? इंधनातील इथेनॉलचे प्रमाण आणखी वाढवले गेले असावे अशी शंका आहे."
- ऐनुद्दीन खताल, शहर उपाध्यक्ष, टु व्हिलर मेकॅनिक असोसिएशन
"इंधन टाकीत पावसाचे पाणी गेल्यानंतर इथेनॉलच्या संपर्कात आल्याने त्याचे विघटन होऊन जेली तयार होते. वाहन स्थिर राहिल्यानंतर ती जेली कार्बोरेटरमधील इंधनाच्या तळाशी साचते. शक्यतो पाण्यापासून इंधन टाकीचा बचाव करा. पावसाळ्यात वाहन जास्त काळ स्थिर राहणार नाही याची दक्षता घ्या."
- संतोष आरवटगी, इंधन पंप चालक