
आस्वादाची माध्यमे बदलली तरी वाचनाचे महत्व कमी होणार नाही. ही श्रीमंती शाश्वत आहे. ती सतत वधिष्णूच राहील असा विश्वास प्रा. वैजनाथ महाजन यांनी आज व्यक्त केला.
अंकलखोप (जि. सांगली) : आस्वादाची माध्यमे बदलली तरी वाचनाचे महत्व कमी होणार नाही. त्यामुळे वाङमयाचे काय होणार याची चिंता नको, ते माणसाला समृद्ध बनवते, ही श्रीमंती शाश्वत आहे. ती सतत वधिष्णूच राहील असा विश्वास प्रा. वैजनाथ महाजन यांनी आज व्यक्त केला. औदुंबर ( ता. पलुस) येथे सदानंद साहित्य मंडळाच्या 78 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे खासदार श्रीनिवास पाटील यांची उपस्थिती होती.
प्रा.महाजन म्हणाले "" साहित्य सतत विकसित होणारी गोष्ट आहे. ती वर्धिष्णू आहे. त्यामुळे वाचनानं काय मिळतं असा असा दळभद्री प्रश्न विचारणाऱ्यांना काय उत्तर देणार? आपल्या सभोवतीचं सारं काही लिहिण्यासारखे असते. दैनंदिन अनुभव, घटनांमधूनच अनेक अजरामर साहित्य निर्माण झाले आहे. अनुभव शब्दातूनच व्यक्त होतो. शब्दाशिवाय जीवन असंभव आहे. त्यामुळे साहित्य, वाचन चळवळही शाश्वत असेल.''
ते म्हणाले,"" लेखन साधना आहे. नवोदितांनी आपली साहित्यकृती पुन्हा पुन्हा वाचावी. ती समजून घ्यावी. बा. भ. बोरकर यांची एक कविता अठरा वर्षे खोळंबली होती. इतकी वर्ष वाट बघण्याची तुमचीही तयारी हवी. त्यातले गांभीर्य महत्वाचे आहे. तुमचं उपजिविकेचं क्षेत्र महत्वाचे नाही. कोणत्याही व्यवसायातील व्यक्ती लिहू शकते. एखादी काव्य ओळ सापडते तेव्हा नवे काही निर्माण होते. त्यातून कवी सांगतो काय हे महत्वाचे. ''
यावेळी खासदार पाटील म्हणाले,"" कवी संमेलनाला माणसे बोलवावी लागतात. इथला अनुभव मात्र वेगळा आहे. इथं प्रत्येक जण आपल्या जवळील देतो व दुसऱ्याचे घेऊन जातो. कृष्णाकाठच्या या अखंडित ज्ञानवर्षावाने माझे आयुष्य सतत चिंब झाले आहे. इथं चांगले विचार ऐकण्याचा सतत अनुभव आला आहे.''
तत्पुर्वी कवी संमेलनात नामदेव जाधव, प्रा. संजय ठिगळे, अपर्णा जोशी, चंद्रकांत कन्हेरे, संजय कोष्टी, बटू हेरवाडे , प्रकाश जाधव, पवन जोशी, प्रकाश कुलकर्णी, चंद्रकांत देसाई, नुतन सुर्यवंशी, आनंदराव कोरे, दत्ता गायकवाड यांनी कविता वाचन केले. प्रा. संतोष काळे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सरपंच अनिल विभुते, उपसरपंच विनय पाटील, शामराव पाटील, गिरीश चितळे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक शहाजी सूर्यवंशी यांनी केले. सुभाष कवडे यांनी परिचय करुन दिला. भक्ती जोशी, वासुदेव जोशी, संतोष जोशी यांनी स्वागत गीत गायले. सूत्रसंचालन वासुदेव जोशी यांनी केले. पुरुषोत्तम जोशी यांनी आभार मानले.
संपादन : युवराज यादव