
विद्यार्थ्यांमध्ये अधिक संभ्रमावस्था निर्माण होईल असे मत शिक्षक व प्राध्यापकांमधुन व्यक्त होऊ लागले आहे
बेळगाव : दहावी व बारावीच्या वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण खात्यातर्फे देण्यात आली आहे. मात्र शाळा व पदवी विद्यालये सुरु झाल्याशिवाय वेळापत्रक जाहीर करण्यात आले तर विद्यार्थ्यांमध्ये अधिक संभ्रमावस्था निर्माण होईल असे मत शिक्षक व प्राध्यापकांमधुन व्यक्त होऊ लागले आहे.
शिक्षण मंत्री एस. सुरेशकुमार यांनी पुढील आठवड्यात दहावी व बारावीचे वेळापत्रक जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जुन किंवा जुलै महिन्यात परीक्षा होण्याची शक्यता आहे. मात्र शाळा कधीपासुन सुरु होणार याबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे शाळा व विद्यालये सुरु होण्याअगोदरच वेळापत्रक जाहीर करण्यात आले तर कोरोनाच्या संकटामुळे शैक्षणिक वर्षात एक दिवसही शाळेत न आलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करणे अवघड जाणार आहे.
तसेच दहावी व बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्वाची परीक्षा आहे. याचा विचार शिक्षण खात्याने करणे आवश्यक आहे. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फक्त विद्यागम योजनेअंतर्गत फक्त काही दिवस शिकविण्यात आले आहे. त्यामुळे काही दिवस शाळा सुरु झाल्यानंतर वेळापत्रक जाहीर करण्यात आले तर अधिक चांगले होईल असे मत व्यक्त होत आहे.
हेही वाचा - ऑनलाईन शिक्षण बंद होणार नाही ; शिक्षण खात्याने दिले स्पष्टीकरण -
"शाळा अजुन सुरु झालेल्या नाहीत त्यामुळे अगोदरच वेळापत्रक जाहीर करण्यात आले. तर अभ्यासापासुन दुर असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ वाढणार आहे. याचा विचार शिक्षण खात्याने करणे आवश्यक असुन शाळा कधीपासुन सुरु होतील याप्रमाणे वेळापत्रक तयार केले पाहीजे तरच विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाताना अवघड जाणार नाही."
- बी. आर. बुवाजी, मुख्याध्यापक, शिवाजी हायस्कुल
"पदवी विद्यालये अद्याप सुरु झालेली नाहीत त्यामुळे विद्यार्थी अभ्यासापासुन दुर आहेत. त्यामुळे विद्यालये अगोदर सुरु होणे आवश्यक असुन शिक्षक व विद्यार्थी यांचा सर्व प्रथम संवाद होणे आवश्यक आहे. त्यामुळे वेळापत्रक जाहीर करण्याबाबत घाई करण्याऐवजी विद्यालये सुरु झाल्यानंतर वेळापत्रक जाहीर केले तर अधिक चांगले होईल."
- प्रा. अरविंद पाटील, ताराराणी पदवीपुर्व महाविद्यालय
संपादन - स्नेहल कदम