तिसऱ्या कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाच्या संपर्कातील लोकांची तपासणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

प्रशासनाने सांगितलेल्या सर्व उपाययोजनेची नागरिकांनी काटेकोर अंमलबजावणी करावी, अन्यथा कठोर पावले उचलली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

नगर : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून प्रशासनाने पावले उचलली आहेत. जिल्ह्यात सापडलेल्या तिसऱ्या रुग्णांच्या नगरमधील घराच्या परिसरातील सर्व नागरिकांची जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात येत आहे.  

नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत घाबरून जाण्याची गरज नाही, स्वच्छता ठेवा, काळजी घ्या, घराच्या बाहेर पडू नका, असे आवाहन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक बापूसाहेब गाढे यांनी केले.

कोरोना विषाणूने जगभरात थयथयाट घातला आहे.  देशात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे.कोरोनाच्या रुग्णांची जिल्ह्यात संख्या तीनवर पोहोचली आहे. तिसरा रुग्ण हा एक डॉक्टर असल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे शोध घेऊन, त्याची तपासणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर डॉक्टर असलेल्या तिसऱ्या रुग्णाच्या परिसरातील सर्व नागरिकांची तपासणी होत असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

प्रशासनाने सांगितलेल्या सर्व उपाययोजनेची नागरिकांनी काटेकोर अंमलबजावणी करावी, अन्यथा कठोर पावले उचलली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. ज्या लोकांच्या हातावर होम क्वॉरंटाईनचे शिक्के मारले आहेत. त्यांना काही सूचना दिल्या आहेत. त्यांनी घरात विलगीकरण करून घेतले पाहिजे. हे लोक समाजाच्या संपर्कात येणार नाहीत, याची खबरदारी घेण्याची गरज आहे.

आतापर्यंत नगरमध्ये मोठ्या प्रमाणात संशयित आढळून आले आहेत. मात्र, सुदैवाने पॉझिटिव्ह येणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An examination of people in contact with a third corona-positive patient