
कोरोनासाठी कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यास संबंधित सरकारी कर्मचाऱ्यांच्या उपचारांचा सर्व खर्च राज्य सरकार करेल, अशी ग्वाही सहकार आणि पणन राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी आज दिली.
मिरज (जि. सांगली) : कोरोनासाठी कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यास संबंधित सरकारी कर्मचाऱ्यांच्या उपचारांचा सर्व खर्च राज्य सरकार करेल, अशी ग्वाही सहकार आणि पणन राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी आज दिली.
कोरोनाच्या संचारबंदी कालावधीमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या सरकारी सेवेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांचा विशेष सत्कार आज गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलात करण्यात आला. गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलाच्यावतीने आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
डॉ. कदम म्हणाले,""तीन महिन्यांत कोरोनासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांत आरोग्य विभाग, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सफाई कामगार, पोलीसासह सर्वच विभागांच्या सरकारी कर्मचाऱ्यांनी मोठे योगदान दिले आहे. प्रामुख्याने आरोग्य, स्वच्छता आणि पोलीस या विभागातील काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कोरोनाचा संसर्गही झाला. त्या सर्व कर्मचाऱ्यांवरील उपचारांचा खर्च सरकारने केला. यापुढेही करण्यात येईल. सरकार जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.''
गुलाबराव पाटील संकुलाचे कुटुंबप्रमुख पृथ्वीराज पाटील यांनी प्रास्ताविक केले. कोरोनासाठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा यथोचित गौरव करणे समाजातील प्रत्येकाचे कर्तव्य आहे याचे भान ठेवून आणि आपली नैतिक जबाबदारी समजून कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस उपाधीक्षक संदीपसिंह गिल, महापालिका उपायुक्त स्मृती पाटील, मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. प्रकाश गुरव यांना सन्मानित करण्यात आले.