उत्पन्नापेक्षा खर्च अधिक जास्त : इस्लामपुरात राजारामबापू नाट्यगृहाची अवस्था

पोपट पाटील
Sunday, 25 October 2020

इस्लामपूर  येथील राजारामबापू नाट्यगृहात 2019-20 या आर्थिक वर्षात सांस्कृतिक कार्यक्रमाच्या कमतरतेमुळे उत्पन्नापेक्षा खर्च अधिक झाला आहे.

इस्लामपूर (जि. सांगली) : येथील राजारामबापू नाट्यगृहात 2019-20 या आर्थिक वर्षात सांस्कृतिक कार्यक्रमाच्या कमतरतेमुळे उत्पन्नापेक्षा खर्च अधिक झाला आहे. गेल्या काही वर्षांतील राजारामबापू नाट्यगृहावर झालेला खर्च व मिळालेले उत्पन्न याचा आढावा घेतल्यास अंगा पेक्षा भोंगा मोठा झाल्याचे दिसून येते. 

2019- 20 या आर्थिक वर्षातिल खर्च पहिला असता उत्पन्न दीड लाख खर्च 3 लाख झाला आहे. इस्लामपुरात सांस्कृतिक चळवळ रुजण्यासाठी मंत्री जयंत पाटील संकल्पनेतून येथील नगरपालिका शेजारी राजारामबापू नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली. 17 जानेवारी 2011 रोजी प्रसिद्ध अभनेते व रंगकर्मी नाना पाटेकर यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले.

तालुक्‍यातील सांस्कृतिक रंग भूमीला गती मिळावी या उद्देशाने याची उभारणी करण्यात आली होती. गाजलेली रंगभूमीवरील नाटके प्रेक्षकांना बघता यावीत सोबत त्यापासून नागरपालिकेस आर्थिक उत्पन्न सुरू राहील हा त्यामागील उद्देश होता. परंतु त्याचा प्रभाव कमी होत गेला. हळूहळू नाटकाचे कार्यक्रम बंद होऊ लागले. त्यापासून आर्थिक उत्पन्न कमी झाले. त्यानंतर नगरपालिकेने हे नाट्यगृह इतर कार्यक्रमांना भाड्याने देणे सुरू केले आहे.

1 एप्रिल 2019 पासून 31 मार्च 2020 वर्षाकाठी साधारण 1 लाख 59 हजार इतके उत्पन्न मिळाले आहे. परंतु या वर्षासाठी 2 लाख 4 हजार 730 इतके लाईट बिल, स्वच्छता कामगार 50 हजार, ठेकेदारास 52 हजार 500 असा एकूण 3 लाख 700 रुपये इतका खर्च झालेला आहे. त्यामधून मिळणाऱ्या उत्पन्नातून खर्चाचा ताळमेळ कसा साधणार हा मोठा गंभीर प्रश्न आहे. 

नाट्यगृह सुरू होऊन दहा वर्षे झालीत. आता त्याची दुरुस्ती सुरू झाली आहे. गेल्या चार महिन्यांत नाट्यगृहावरील छताचे दुरुस्तीचे काम करण्यात आले. त्यासाठी साधारण 15 लाखांपर्यंतचा खर्च केलेला आहे. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Expenses more than income : Rajarambapu Natyagriha in Islampur