घरकुले बांधली; त्या घरांवर आता कौलेही नाहीत 

युवराज पाटील- सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - गावातील डेअरीचा चेअरमन ह्योच, सोसायटीही याच्याकडे. यंदा एखाद्या कार्यकर्त्याला संधी दे म्हटले तर आपल्याच घरातील उमेदवार पुढे आणले. लोकांना आपण घरकुले बांधून दिल्याचे सांगतो. या घरांची कौले निघाली तरी याच्या कुटुंबातील उमेदवारी काही सुटत नाही. 

कोल्हापूर - गावातील डेअरीचा चेअरमन ह्योच, सोसायटीही याच्याकडे. यंदा एखाद्या कार्यकर्त्याला संधी दे म्हटले तर आपल्याच घरातील उमेदवार पुढे आणले. लोकांना आपण घरकुले बांधून दिल्याचे सांगतो. या घरांची कौले निघाली तरी याच्या कुटुंबातील उमेदवारी काही सुटत नाही. 

यंदा मात्र आम्ही निर्णय घेतला, की धडा शिकवायचाच. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना असाच एक कार्यकर्ता "सकाळ'कडे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत होता. तो कोणत्या पक्षाचा आहे हा भाग गौण असला तरी नेते कार्यकर्त्यांना कसे वापरून घेतात आणि निवडणूक लागली की घराणेशाही लादतात याचे उत्तम उदाहरण म्हणून पाहता येईल. 

निकालही काहीही लागेल; पण भविष्यात आपल्याच कुटुंबातील उमेदवार दिले, की त्याचे काय परिणाम होऊ शकतात याची झलक हा कार्यकर्ता दाखवून गेला. दानोळी (ता. शिरोळ) येथून दुपारी उन्हाच्या रखातच बाहेर पडलो. पुढे अर्धा किलोमीटर अंतरावर प्रचार फेरी सुरू होती. जाहीर प्रचाराची सांगता होण्यासाठी एक दिवस राहिल्याने शनिवारचा दिवस सर्वच उमेदवारांसाठी महत्त्वाचा होता. थोडं ऊन खाली झाल्यावर जाऊ, किती फिरणार, किती वेळा हात जोडणार, किती घरात जाणार ही अशी कारणे तरी सांगून चालणार नव्हती. त्यामुळे उन्हाची पर्वा न करता जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोचण्याचा उमेदवारांचा प्रयत्न होता. 

माजी मंत्री विनय कोरे यांचा कस लागणाऱ्या किणी- घुणकी येथून प्रवासास सुरवात झाली. गट आणि गणातील सर्वच पक्षांचे उमेदवार सकाळी नऊच्या सुमारास प्रचारासाठी बाहेर पडले होते. त्यांच्यासोबत ठराविक कार्यकर्ते होते. मोठ्या संख्येने मतदार असलेल्या गावात प्रमुख कारभारी आणि कार्यकर्ते थांबून होते. मतदानासाठी दोनच दिवस राहिल्याने "जोडण्या' लावण्यात ते व्यस्त होते. प्रमुख चौकात प्रचाराच्या गाड्या फिरत होत्या. गल्लोगल्ली प्रत्येक घरावर अमूक एका पक्षाचे झेंडे नजरेस पडले. त्या गल्लीत आपलेच गठ्ठा मतदान आहे, असे दाखविण्याचा हा प्रयत्न होता. सकाळची गडबड असल्याने लोकांना मात्र प्रचाराशी काही देणे-घेणे नव्हते. पुढे वडगाव, नरंदे, कुंभोज येथेही फारशा हालचाली नव्हत्या. दानोळीत मात्र मुख्य चौकात प्रचाराच्या गाड्यांची वर्दळ होती. या पंचकोशीतील गावे म्हणजे कॉंग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यात काट्याची लढत. काही ज्येष्ठ निवृत्त झाले तरी राजकारणाची कास काही सुटत नाही. वयाचा विचार न करता गावातील मंडळी प्रचारासाठी दुसऱ्या गावात निघून गेलेली. दानोळीतून बाहेर पडल्यानंतर पुढे अशीच एका उमेदवाराची प्रचार फेरी जात होती. छायाचित्रासाठी आम्ही थांबलो तेवढ्यात एक कार्यकर्ता गाडीजवळ आला. त्याला कोणाचा जोर आहे, असे म्हणायचा अवकाश, मनात जे काही दडले आहे ते एका डावात गड्याने सांगण्यास सुरवात केली. आम्ही इतकी वर्षे पाठीमागे फिरलो. यंदा वाटलं एखाद्या कार्यकर्त्याला संधी मिळेल; पण आपल्याच कुटुंबातील उमेदवाराचे घोडे पुढे दामटले. ते ज्यावेळी लोकप्रतिनिधी होते त्यावेळी घरकुले बांधून दिल्याचे आजही सांगतात. लोक म्हणतात घरकुले बांधली खरी; पण घराची कौलेही आता राहिलेली नाहीत. "निकाल काय लागणार,' असा प्रश्‍न केला असता अमूक तीन गटांचे गठ्ठा मतदान पडले की आमची "सीट' आलीच म्हणून समजा. 

संबंधित कार्यकर्त्याची भावना ऐकून उत्तर काय द्यायचे तेच समजेना. पुढे उदगाव येथे मात्र प्रचाराचा रंग काही वेगळाच होता. लहान मुलांसह, पुरुष मंडळी आणि महिलाही प्रचारात मागे नव्हत्या. उन्हाचा तडाखा जेवढा होता तेवढाच हलगीचा कडकडाटही. शनिवारी सकाळची शाळा असल्याने मुलेही जोशात होती. थोडी चौकशी केली असता उदगावमध्ये मतदार संख्या मोठी आहे. हे गाव निर्णायक आहे. हा कुणाचा बालेकिल्ला आहे याची माहिती आहे. त्यामुळे अडचण नसल्याचे कार्यकर्ते सांगत होते. ते किती खरे आहे हे गुरुवारीच स्पष्ट होईल. 

कार्यकर्त्यांचा उत्साह 
दुपारच्या रखात शिरोळमध्ये हालचाल होती; मात्र जाहीर प्रचार कुठे दिसत नव्हता. जयसिंगपूरमध्ये थोडी वर्दळ होती. प्रचाराच्या गाड्या रस्त्याच्या बाजूला थांबून होत्या. नंतर सांगली- कोल्हापूर रस्त्यावरून बाहेर पडलो. लगतच्या गावात डोकावून पाहिले; पण दुपारची वेळ असल्याने कुठेच काही नजरेस पडत नव्हते. सांगली फाट्यापासून गाडी वळवून थेट गाठले वडणगे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असे गाव. एकाच पक्षाला किती वर्षे निवडून द्यायचे, आता बदल करू या, असे उत्साही कार्यकर्ते येथे सांगत होते. निगवे येथेही चौकात प्रचार फलक झळकत होते. प्रयाग चिखली येथे एका उमेदवार गाडीवरील चित्रफितीद्वारे त्यांना मतदान का करा, हे सांगत होते. गावात मुली आणि महिला निवेदने वाटण्यात व्यस्त होत्या.

Web Title: Expressed anger over the royal house