esakal | जतसाठी "म्हैसाळ'ची विस्तारीत 838 कोटींची योजना; वंचित 65 गावांतील शेतीचे सिंचन
sakal

बोलून बातमी शोधा

 Extended 838 crore scheme of 'Mahisal' for Jat; Irrigation of deprived 65 villages

म्हैसाळ योजनेच्या पाण्यापासून जत तालुक्‍यातील पूर्णतः वंचित 48 गावे व अंशतः वंचित 17 गावांसाठी 838 कोटींची नवी विस्तारीत योजना तयार करण्यात आली आहे.

जतसाठी "म्हैसाळ'ची विस्तारीत 838 कोटींची योजना; वंचित 65 गावांतील शेतीचे सिंचन

sakal_logo
By
जयसिंग कुंभार

सांगली ः म्हैसाळ योजनेच्या पाण्यापासून जत तालुक्‍यातील पूर्णतः वंचित 48 गावे व अंशतः वंचित 17 गावांसाठी 838 कोटींची नवी विस्तारीत योजना तयार करण्यात आली आहे. विस्तारीत जत उपसा सिंचन योजना नावाने प्रस्तावित योजनेसाठी मुळ म्हैसाळ योजनेतील टप्पा क्रमांक तीन (बेडग) मधून थेट पाणी उचलले जाणार आहे. त्यासाठी पाच टीएमसी राखीव पाण्याची तरतूद असेल. त्यातून 65 गावांतील 50 हजार एकर (20 हजार 243 हेक्‍टर) क्षेत्र ओलिताखाली येईल. 

कायम दुष्काळी भागासाठी सहा टप्प्यात राबवण्यात आलेल्या म्हैसाळ योजनेत आत्तापर्यंत जत तालुक्‍यातील 125 गावांपैकी 77 गावांना पाण्याचा लाभ झाला आहे. सध्यस्थितीत जत तालुक्‍यातील योजनेची 50 टक्के कामे पुर्ण झाली आहेत. 77 गावांतील टंचाईची भीषणता बऱ्यापैकी कमी झाली. उलट याच तालुक्‍यातील तब्बल 48 गावांना आजवर पाणी द्यायचे कोणतेही नियोजन राज्य शासनाकडे नव्हते. यावेळी प्रथमच जलसंपदा विभागाने म्हैसाळ योजनेतून या वंचित गावांसाठी पाणी देण्यासाठीचा सर्वंकष प्रस्ताव तयार करून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना सादर केला आहे. 

त्यानुसार या योजनेत सध्याच्या म्हैसाळ योजनेच्या टप्पा क्रमांक तीन बेडग मधून तीन टप्प्यात 180 मीटर इतक्‍या उंचीवर पाणी नेले जाईल. बेडग ते बसाप्पाची वाडी नाला, बसाप्पाचीवाडीत ते मिरवाड तलाव आणि मिरवाड तलाव ते मल्ल्याळ हौद असे तीन टप्पे असतील. मल्ल्याळ डोंगरावरून नैसर्गिक उताराने हे पाणी जत तालुक्‍यातील कोसारी ते उमदी पंचक्रोशीतील सर्व गावांना दिले जाईल. 

योजनेची वैशिष्ट्ये 

  • 65 गावांतील 50 हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार 
  • 462 किलोमीटरच्या पुर्ण बंदिस्त पाईपद्वारे पाणी पुरवठा 
  • बेडग - मल्ल्याळ 11.70 किलोमीटर लांब रायझींग मेनद्‌वारे पाणी उपसा 
  • पंपगृह, वितरण हौदासाठीचे किरकोळ जागा वगळता मोठे भुसंपादन नाही. 
  • योजनेसाठी अतिरिक्त 5 टीएमसी पाणी उपलब्ध करून दिले जाईल. 

कायद्याच्या चौकटीत हे पाणी उपलब्ध होईल

कृष्णा लवादानुसार बिगर सिंचनासाठी 33 टीएमसी पाण्याची तरतुद आहे. सद्यस्थितीत 9 टीएमसी इतका पाणी वापर होतो. वाढती लोकसंख्या आणि उद्योगांचा विचार करता 20 टीएमसी इतका पाणी वापर होईल. म्हणजे 13 टीएमसी पाणी सिंचनासाठी उपलब्ध होऊ शकते. पाच टीएमसी जतच्या वंचित गावांसाठी उपलब्ध करून दिले जाईल. कायद्याच्या चौकटीत हे पाणी उपलब्ध होईल. नव्या योजनेचा प्रस्ताव तांत्रिक व भौतीक व आर्थिकदृष्ट्या परीपूर्ण आहे. तशी शिफारस शासनाकडे केली आहे.'' 

- सूर्यकांत नलवडे, कार्यकारी अभियंता, म्हैसाळ सिंचन योजना 

योजनेसाठी सर्वांनी पुढाकार घेणे हिताचे
उमदी-जालीहाळ पंचक्रोशीतील 45 गावांनी कर्नाटकातील सिंचन योजनांमधून पाणी द्यावे यासाठी गेली काही वर्षे पाठपुरावा सुरु केला होता. कर्नाटक शासनाकडून द्विपक्षीय करारासाठी अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने जलसंपदाने तयार केलेल्या या नव्या प्रस्तावासाठी जनतेतून रेटा निर्माण होणे गरजेचे आहे. कर्नाटकातून जेंव्हा केंव्हा अनुकूल प्रतिसाद मिळेल तेंव्हा कमी खर्चात ते पाणी मिळेलच. मात्र त्याआधी या योजनेसाठी सर्वांनी पुढाकार घेणे हिताचे ठरेल. 
- एन. व्ही. देशपांडे, येरळा प्रोजेक्‍ट सोसायटी 

संपादन : युवराज यादव

loading image