कारखान्यांमध्ये कोविड सेंटर उभारण्याकडे कारखानेच करताहेत दुर्लक्ष 

घनश्‍याम नवाथे
Friday, 28 August 2020

राज्यातील "कोरोना' चा कहर आणि रूग्णांसाठी खाटांच्या कमतरतेमुळे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सहकारी साखर कारखान्यांनी किमान शंभर खाटांचे कोविड सेंटर उभे करावे, असे आवाहन केले होते.

सांगली : राज्यातील "कोरोना' चा कहर आणि रूग्णांसाठी खाटांच्या कमतरतेमुळे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सहकारी साखर कारखान्यांनी किमान शंभर खाटांचे कोविड सेंटर उभे करावे, असे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाकडे जिल्ह्यातील बहुतेक कारखानदारांनी कानाडोळा केला आहे. तेच पालकमंत्र्यांच्या चारशे खाटांच्या अतिरिक्त रुग्णालयाच्या घोषणेचेही झाले आहे. 

वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी घोषणा केली, मात्र त्यांचे प्रशासनाच्या परवानगीविना अडलेय. कोरोना रुग्णांना बेडच मिळत नाहीत या तक्रारीनंतर श्री. पवार यांनी सहकारी कारखान्यांनी उपचाराची किमान प्राथमिक व्यवस्था उभी करण्यासाठी कारखान्यांना आवाहन केले होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 20 दिवसांपूर्वी कराड येथेही तसेच आवाहन केले. तसे झाल्यास तालुकास्तरावरच उपचाराची व्यवस्था अधिक मजबूत होईल. पवारांच्या आवाहनानंतर वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी सुरु नसलेल्या वसंत बझारची इमारत महापालिकेच्या कोविड सेंटरला द्यायची तयारी दर्शवली. महापालिकेने ते स्वीकारले नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःच केंद्र उभारणीसाठी पुढाकार घेत तयारी सुरु केली. मात्र त्यासाठीच्या आवश्‍यक परवानगीचे घोडे महापालिका व जिल्हा प्रशासनाकडे अडल्याचे त्यांनी सांगितले. 

जिल्ह्यात राजाराबापूसह तीन शाखा, क्रांती, विश्‍वास, सोनहिरा, हुतात्मा, मोहनराव शिंदे असे आठ सहकारी तर निनाई (दालमिया), उदगीर, श्री श्री रवीशंकर, असे तीन खासगी साखर कारखाने सुरु आहेत. त्यांच्याकडूनच अशी अपेक्षा करता येईल. मात्र कारखानदारांकडून त्यासाठी अद्याप अनुकूल प्रस्ताव आलेले नाहीत. काही कारखान्यांनी सॅनिटायझरची निर्मिती करून मोफत वाटप केले. ऊसतोड मजुरांची हंगामानंतर काही दिवस सोय करून दिलासा दिला. 

क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी सिव्हिल हॉस्पिटलला ऑक्‍सिजन पुरवठा करणारी यंत्रणा देऊन मदतीचा हात दिला आहे. अशा स्वरुपाची मदत मिळाली तर ती प्रशासनाला हवीच आहे. परंतू सध्याची स्थिती पाहता अशा सेंटरसाठी पुढाकार घेतला तर अधिक गरजेचे आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांनी 15 ऑगस्टच्या बैठकीत चारशे खाटांच्या रुग्णालय उभे करण्याची घोषणा केली होती. त्यावर प्रशासनाची अद्यापही चुप्पी आहे. महापालिकेच्या कोविड केंद्राची स्थिती रुग्णालयापेक्षा अलगीकरण कक्ष असे त्याचे स्वरुप आहे. 

आता सरकारकडूनच कोविड सेंटर उभारणीसाठी सक्ती आदेश येण्याची शक्‍यता आहे. यंदाचा गाळप परवाना देताना अशी अट घालावी अशी मागणी होत आहे. कारखानदारांकडून कोविड सेंटरसाठी गोदामे घ्यावीत असा प्रस्ताव आहे. मात्र आधीच अडचणीत असलेल्या कारखानदारांची स्टाफ, डॉक्‍टर, वैद्यकीय उपकरणांसाठी खर्चाची तयारी नसल्याचे कानोसा घेतला असता दिसून आले. 

कोविड सेंटर उभे करणे केवळ खर्चाच्या दृष्टीने अवघड नाही तर त्यासाठी आवश्‍यक मनुष्यबळ उपलब्ध करणे ही देखील मोठी अडचण आहे. कारखानदारांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून सध्या सुरु असलेल्या सेंटर्सना मनुष्यबळ व अन्य वैद्यकीय साहित्याची मदत कशी देता येईल या पर्यायाचाही विचार करावा.'' 
- डॉ. बिंदुसार पलंगे 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Factories are neglecting to set up covid centers in factories