बिंग फुटले : इस्लामपुरात या तोतया अभियंत्यास अटक...वाचा त्याचे कारनामे

sanjay more.jpg
sanjay more.jpg

इस्लामपूर (सांगली) - सार्वजनिक बांधकाम विभागात उपकार्यकरी अभियंता असल्याचे भासवून रुबाबात वावरणाऱ्या तोतया भामटा संजय शहाजी मोरे (वय 25, रेठरेहरणाक्ष, ता.वाळवा) याला इस्लामपूर पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली. उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. पोलीस निरीक्षक नारायण देशमुख उपस्थित होते. दरम्यान, आज संजय मोरे याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 5 जून पर्यंत पोलीस कोठडी दिली. 


श्री. पिंगळे म्हणाले,""रेठरेहरणाक्ष परिसरात गस्त घालत असताना इस्लामपूर पोलिसांना चारचाकी गाडी दिसून आली. त्यावर समोरील बाजूस लाल अक्षराने महाराष्ट्र शासन व मागील बाजूस ऑनड्युटी पी.डब्लू.डी. असे लिहिलेले आढळले. त्या वाहनाची तपासणी केली असता गाडीत असणारा संजय मोरे प्रशासकीय अधिकारी असल्याच्या अविर्भावात पोलिसांना मोठ्या आवाजात बोलत होता. "माझे मोठ्या अधिकाऱ्यांशी जवळचे संबंध आहेत. मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांचे पगार मी काढून दिलेत. तुम्ही डेप्युटी कमिशनरची बांधकाम विभागाची गाडी अडवताय कळत नाही का?' 


पोलिसांना संशय आल्याने कसून चौकशी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता शिरगुप्पे याच्याकडे संजय मोरेबाबत माहिती घेतली. त्यावेळी असा कोणताही अधिकारी अस्तित्वातच नसल्याचे समजले. त्याची खात्री करण्यासाठी सहाय्यक स्थापत्य अभियांत्रिकी कुंडलिक रंगराव पाटील यांना पोलिसांसोबत पाठवले. या पथकाला रेठरेहरणाक्ष येथे मोरे त्याच्या घरी मिळाला. त्याने सार्वजनिक बांधकाम विभाग कसबा बावडा कोल्हापूर येथे उपकार्यकरी अभियंता असल्याचे सांगितले. त्याला ओळखपत्र मागितले असता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्या घरावर राजमुद्रा असलेला "महाराष्ट्र शासन श्री संजय शहाजी मोरे' असा फलक आढळून आला. त्याच्या वापरात असलेले चारचाकी वाहन (एम एच 46- पी - 7179) गाडीवर समोरील बाजूस लाल अक्षराने महाराष्ट्र शासन व पाठीमागील बाजूस ऑन ड्युटी पी.डब्लू.डी. असे लिहिलेले आढळले. संजयला पोलिसांनी विचारले असता काहीही माहिती देता आली नाही.'' 


ते म्हणाले,""संजयने सार्वजनिक बांधकाम विभागाचा तोतया अधिकारी बनून शासनाची व सामान्य जनतेचची फसवणूक केली आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सार्वजनिक बांधकाम विभाग(इस्लामपूर) कुंडलिक रंगराव पाटील यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोरेवर अयोग्य उपयोग प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

"प्रसिद्ध' च्या हवेचे बिंग फुटले 

स्वतःची गाडी बिघडल्याने संजय मोरेने गावातील प्रतिष्ठिताची गाडी दोन दिवसांसाठी घेतली. जादा पगाराचे आमिष दाखवून चालकाची नेमणूक केली. स्वतः प्रसिद्ध असल्याचे वातावरण निर्माण केले आणि त्याचे बिंग फुटले. 

अनेक कारनाम्यांची चर्चा 

संजय मोरे हा बांधकाम विभागाचा कमिशनर बोलतोय म्हणून अनेकांना फोन करीत होता. आता तो बांधकाम मंत्र्यांचे नाव घेऊन त्यांच्याकडे पी. ए. म्हणून काम केल्याची बतावणी करीत होता. त्यातून त्याने ठेकेदारांची यादी मिळवून लाखोंचा गंडा घातला आहे. कर्नाटकातील एका पतसंस्थेच्या चालकाचे राज्यातील एका मंत्र्यांच्याशी जवळचे संबंध आहेत. त्यात पैसे ठेवा पाच वर्षात दामदुप्पट मिळतात, असे सांगून ठेवी गोळा केल्या आहेत. तो बांधकाम विभागात नोकऱ्या लावतो, म्हणूनही पैसे गोळा करीत असल्याचा संशय आहे. 

फसलेल्यांना संपर्काचे आवाहन 

संजय मोरेकडून कोणाची फसवणूक झाली असल्यास इस्लामपूर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, राजमुद्रेचा कोणी गैरवापर करीत असल्याचे आढळल्यास कडक कारवाई केली जाईल, असे आवाहन पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com