esakal | अतिवृष्टीची भरपाई, विमा, अनुदानात अडचणीच अधिक; घोषणा विरल्या हवेत 

बोलून बातमी शोधा

Farmar still waiting for Over Rain compensation, insurance, grants }

आटपाडी तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी शासनाने अनेक घोषणा केल्या. मात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या नाहीत.

अतिवृष्टीची भरपाई, विमा, अनुदानात अडचणीच अधिक; घोषणा विरल्या हवेत 
sakal_logo
By
नागेश गायकवाड

आटपाडी (जि. सांगली) : आटपाडी तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी शासनाने अनेक घोषणा केल्या. मात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या नाहीत. मार्चअखेर आला तरी जाहीर अवकाळी भरपाई, विमा आणि सोसायटीचे नियमीत कर्ज भरणाऱ्यांसाठीचे अनुदान अजून मिळालेले नाही. त्यामुळे सोसायट्या व राष्ट्रीयीकृत बॅंकांची पिक कर्ज वसुली ठप्प होणार आहे. 

कमी पाण्यावर येणारी खरीप, रब्बी पिके तालुक्‍यात घेतली जातात. डाळिंबासह विविध फळपिकेही जातात. यावर्षी जून ते ऑक्‍टोंबर या पाच महिन्यात विक्रमी एक हजार मिलिमीटर पाऊस झाला. तीन वेळा एकाच वेळी शंभर मिलिमीटरवर इतका पाऊस झाला. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला. अवकाळी भरपाई लालफितीत, विमा जाचक अटीत आणि प्रोत्साहन अनुदान अंमलबजावणीत अडकले 

खरीपातील पिके पाण्याखाली बुडून कुजून गेली. रब्बीची पेरणी वेळेत झाली नाही. तर फळबागा वाया गेल्या. शेतकऱ्यांचा आर्थिक स्रोत आटला. राज्य शासनाने अवकाळी भरपाईची घोषणा केली. मात्र अद्याप शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाची चार कोटींची मदत लालफितीच्या कारभारात अडकून पडलीय. 

एकीकडे सरकारने कृषी आणि महसूलकडून प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामे केले. मात्र विमा कंपनीने शेतकऱ्यांचे नुकसान मान्य केले नाही. विमा कंपन्यांच्या जाचक अटीमुळे नुकसान होऊनही विम्याबाबत प्रश्न निर्माण झाला. राज्य शासनाने हस्तक्षेप करून विमा कंपनीकडून भरपाई मिळवून देण्याची गरज आहे. राज्य सरकारने सत्तेवर आल्यावर कर्जमाफीची घोषणा केली. नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार अनुदानाची घोषणा केली. गेल्यावर्षी कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. शासन सावरत आहे. मात्र प्रोत्साहन अनुदानाच्या अंमलबजावणीवर कोणीही बोलत नाही. अवकाळी भरपाई लालफितीत, विमा जाचक अटीत आणि प्रोत्साहन अनुदान अंमलबजावणीत अडकले आहे. त्याचा परिणाम शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाच्या वसुलीवर झाला. विकास सोसायटी, राष्ट्रीयीकृत बॅंकांसमोर मार्चअखेर पिक कर्जवसुलीचे आव्हान आहे. 

शंभर कोटीवर कर्ज थकणार 

आटपाडी तालुक्‍यात जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने सोसायटीच्या माध्यमातून डाळिंब, ज्वारी, बाजरी, ऊस आणि द्राक्ष पिकासाठी 93 कोटी 58 लाख रुपये पीक कर्जाचे वाटप केले आहे. तर राष्ट्रीयकृत बॅंका मधून अंदाजे वीस कोटी रूपये पीक कर्जाचे वाटप केले आहे. वर्षभर सर्वच बॅंका आणि पतसंस्थांच्या वसुलीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. अवकाळीने नुकसान झाल्यामुळे आणि शासनाकडून कोणतीच मदत न मिळाल्याने पिक कर्ज वसुलीवरही प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

संपादन : युवराज यादव