esakal | अन्नदाता मात्र शेतात क्वारंटाईन...

बोलून बातमी शोधा

 The farmer quarantine in the field

आजही गावातला शेतकरी शिवारात दिवसभर घाम गाळतच असून जणू तो फार्मक्वारंटाईनच झाला आहे. उलट मजूर नसल्याने कुटुंबासह तो राबताना दिसत आहे. 

अन्नदाता मात्र शेतात क्वारंटाईन...
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली ः कोरोनाने शहरे लॉकडाऊन झाली असली तरी गावगाडा मात्र धिम्या गतीने सुरु आहे. कारण शेतकऱ्याला सुट्टी नाही. त्याला शेतात खपावेच लागते. आजही गावातला शेतकरी शिवारात दिवसभर घाम गाळतच असून जणू तो फार्मक्वारंटाईनच झाला आहे. उलट मजूर नसल्याने कुटुंबासह तो राबताना दिसत आहे.

शेतात सध्या शाळू , हरभरा, गहू, कांदा, लसूण आदी पिके काढणीच्या टप्प्यात आहेत. लॉकडाऊन मुळे आवश्‍यकतेनुसार शेतमजूर मिळत नाहीत. मळणी मशीन, हळद शिजवण्यासाठी कुकर, इतर कामांसाठी यांत्रिक उपकरणे गरजेनुसार उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे तो आणखी चिंताग्रस्त आहे. दुधाची मागणी नेहमीप्रमाणे नसल्याने गावातील छोटे -छोटे डेअरी व्यावसायिक, गवळी यांनी शेतकऱ्यांकडून दूध घेणे काही प्रमाणात कमी केले आहे. रोजच्या जगण्याची गरज भागवणाऱ्या दूध,अंडी, भाजीपाला, फळे, या सर्वांची विक्री मंदावल्याने तो चिंताग्रस्त आहे. 

टीव्ही, मोबाइल, व्हाट्‌सअप , फेसबुक अशा आयुधांनी कोरोनाचे काय चाललंय याची माहिती गावातील तरुणांकडून त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे. मात्र शेत शेतातल्या पिकांचा काय करायचं हा प्रश्न त्याला सतावतो आहे. शाळू, हरभरा , गहू या पिकांची मळणी अर्धवट स्थितीत आहे. जिल्ह्यातील अजूनही सुमारे 20 ते 25 टक्के द्राक्ष क्षेत्र काढणीच्या टप्प्यात आहे. मात्र व्यापारी नाही आणि जरी असलाच व्यापारी तरी तो मार्केटमध्ये मागणी नाही या सबबीखाली दर पाडून मागतो आहे.

शहरात विक्रीसाठी भाजीपाला नेहमीप्रमाणे विक्रीसाठी नेता येत नसल्याने तो शेतात सडत आहे. कोथिंबीर, मेथी , दोडका, वांगी, शेवगा, भोपळा, पालक अशी भाजीपाला वर्गीय पिके योग्य वेळेत बाजारात न गेल्याने खराब होत आहेत. कलिंगड , पेरू या फळ पिकांचा हंगाम जिल्हाभर जोरात आहे. मात्र त्याही पिकांची अवस्था शेतात सडून जातील की काय अशी स्थिती आहे. 
सकाळी उठलं की शेतातल्या कामानेच दिनक्रम सुरू करण्याचा त्यांचा शिरस्ता सुरुच आहे.

संचारबंदी मुळे शेतातल्या फेऱ्या थोड्या कमी झाल्यात इतकेच. समोरची अर्धवट स्थितीतील कामे पाहून, होणारे नुकसान पाहून त्याच्या पोटात कालवाकालव होत आहे. शेळ्या-मेंढ्या पाळणारे शेळी-मेंढी पशुपालक जनावरांना घेऊन चारावयास नेत आहेत. त्यांना रोज चरायला नेल्याशिवाय या पशुपालकांना पर्याय नाही. त्यांची अडचण वेगळीच आहे. या जनावरांचे बाजार ठप्प आहेत त्यामुळे महिन्यातून एखादे शेळी-मेंढीचे कोकरू विकून आपला विकून आपला उदरनिर्वाह चालवणारे आणखी अडचणीत आले आहेत. हे सारे किती काळ असा मोठा प्रश्‍न जगाला जगवणाऱ्या अन्नदात्यासमोर आहे.