पेटलेला शेतकरी-कामगार भाजपला हद्दपार करेल : विश्‍वजीत कदम यांचा इशारा... सांगलीत कायद्याविरोधात आंदोलन 

घनश्‍याम नवाथे
Friday, 2 October 2020

सांगली-  देशातील मोठ्या उद्योगपतींच्या हितासाठी कायदे करून शेतकरी व कामगार यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम केंद्रातील भाजप सरकार करत आहे. त्यामुळे शेतकरी व कामगार पेटून उठला आहे. आता सरकारला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजीत कदम यांनी येथे दिला. 

सांगली-  देशातील मोठ्या उद्योगपतींच्या हितासाठी कायदे करून शेतकरी व कामगार यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम केंद्रातील भाजप सरकार करत आहे. त्यामुळे शेतकरी व कामगार पेटून उठला आहे. आता सरकारला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजीत कदम यांनी येथे दिला. 

केंद्र सरकारच्या शेतकरी व कामगार संदर्भातील कायद्याला विरोध करण्यासाठी आज कॉंग्रेस पक्षाच्यावतीने "शेतकरी-कामगार बचाव दिवस' पाळण्यात आला. त्यानिमित्त वसंतदादा मार्केट यार्डात आयोजित आंदोलनात ते बोलत होते. आमदार मोहनराव कदम, डॉ. जितेश कदम, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, शैलजा पाटील, नामदेवराव मोहिते, निरीक्षक तौफीक मुलाणी, युवकचे जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण, हमाल पंचायतीचे विकास मगदूम, स्वाभिमानी संघटनेचे महेश खराडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

राज्यमंत्री डॉ. कदम म्हणाले, ""केंद्रातील भाजप सरकारने शेतकरी व कामगार यांच्यावर जुलमी कायदा लादलेला आहे. त्याला विरोध करण्यासाठी आम्ही महात्मा गांधींच्या जयंतीदिनी आंदोलन करत आहोत. ज्या गांधींनी सत्य व अहिंसेच्या बळावर ब्रिटीशांना हद्दपार केले, त्याच सत्य व अहिंसेचा आज गळा घोटला जात असल्याचे चित्र देशात पहायला मिळते. कॉंग्रेसने आजवर शेतकरी हीत जोपासणारे कायदे केले. त्यांना हमीभाव देण्याची भूमिका घेतली. परंतू आज देशातील विरोधी पक्षाचा आवाज दाबून केंद्रातील सरकारने कायदा आणला आहे. त्यामुळे शेतकरी व कामगार रस्त्यावर उतरला आहे. त्यांचा उद्रेक पाहूनच कायदे चुकीचे असल्याचे स्पष्ट होते.'' 
ते पुढे म्हणाले, ""आज शेतकरी व कामगारांनी या कायद्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. तरच सरकार कशा पद्‌धतीने त्यांचा व कुटुंबियाचा गळा दाबत आहे ते दिसून येईल. तसेच सरकार कशा पद्‌धतीने उद्योगपतींची चाकरी करते तेही दिसेल. सरकारने जुलमी कायदे आणले तरी आजही लोकशाही जीवंत आहे. त्यामुळे आम्ही ते स्विकारणार नाही. कॉंग्रेस पक्ष आणि इतर रस्त्यावर उतरून शेतकरी व कामगार हितासाठी एकजुटीने विरोध करतील.'' 

विशाल पाटील म्हणाले, ""कॉंग्रेस सरकारने शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी बाजार समित्यांची स्थापना केली. त्यांना आजवर संरक्षण दिले. परंतू याच कॉंग्रेसला विश्‍वासात न घेता कायदे केले जात आहेत. त्यातून शेतकरी व कामगार यांना संपवण्याचा उद्योग केला जात आहे. करार शेतीतून भविष्यात शेतकऱ्यांची शेती बळकावली जाऊ शकते. कोरोनाच्या संकटात अशा प्रकारे कायदे घुसवण्याचे काम सरकारने केले असून त्याला रस्त्यावर उतरून विरोध केला जात आहे.'' 
पृथ्वीराज पाटील म्हणाले, ""मोदी सरकारने शेतकरी व कामगारविरोधी कायदे केल्यामुळे त्याला रस्त्यावर उतरून विरोध करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. कायदे रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. कायद्याला विरोध करण्यासाठी जिल्ह्यातून पाच लाख सह्यांचे निवेदन पाठवले जाईल.'' 

हमाल संघटनेचे विकास मगदूम, नगरसेवक अभिजीत भोसले, निरीक्षक तौफीक मुलाणी, महेश खराडे आदींनी मनोगत व्यक्त केले. नगरसेवक मनोज सरगर, सुभाष खोत, बाळासाहेब बंडगर, सौरभ पाटील, वहिदा नायकवडी आदींसह कॉंग्रेसचे आणि हमाल पंचायत व तोलाईदार सभेचे कार्यकर्ते उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers and workers will expel BJP: Vishwajeet Kadam's warning