शेतकरी वैतागले : जनावरे पळविणाऱ्यांचा धुमाकूळ; शेतात सापडली पाय बांधून टाकलेली डुकरे

Farmers are annoyed: the swarm of animal smugglers; Bound pigs found in the field
Farmers are annoyed: the swarm of animal smugglers; Bound pigs found in the field
Updated on

मिरज (जि. सांगली) ः तालुक्‍याच्या पूर्व भागात जनावरे पळविणाऱ्या टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. गोठ्यातील जनावरांसह चरायला सोडलेली ही जनावरे पळवून नेण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांत वाढले. या टोळ्या स्थानिकच आहेत. यापैकी काही जणांना शासनाने पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने गावागावांत आसरा दिला आहे. वड्डी येथे काही दिवसांपूर्वी याच टोळक्‍याने 50 हून अधिक डुकरे पाय बांधून एका शेतात टाकली होती. प्राणीमित्रांनी या डुकरांची मुक्तता केली. 

शासनाने गावागावांत काही भटक्‍या जमातीच्या बांधवांचे जागा देऊन पुनर्वसन केले. यापैकीच काही उपद्रवी टोळक्‍याने जनावरे पळविण्याचा उपद्रव सुरू केला. या टोळक्‍यातील महिलाही अनेक शेतकऱ्यांना शेळ्या, मेंढ्या, बकरी राजरोसपणे मागतात अथवा दमबाजी करून शेतकऱ्यांकडून काढून घेतात. पळविलेल्या जनावरांपैकी खूप कमी जनावरांची विक्री केली जाते. विकण्यासाठीही ती शक्‍यतो कर्नाटकात नेली जातात. अन्यथा ती कापून खाण्यावरच या टोळ्यांचा भर असतो.

ऊस तोडीसाठी आलेल्या तोडकरी टोळ्यांमधील जनावरांच्या पळवापळवीचेही प्रयत्न झाले. पण, या ऊस तोडणाऱ्यांनी जनावरे चोरणाऱ्यांना बऱ्यापैकी चोप दिल्यावर हे प्रकार थांबले. काही शेळी-मेंढीपालन करणाऱ्यांकडून तर याच टोळ्यांमधील गुन्हेगारी पार्श्वभूमीचे तरुण आणि महिला सरळसरळ खंडणी स्वरूपात बोकडे मेंढ्या मागतात. नाही दिले तर त्याच रात्री किंवा त्यानंतर आठ ते दहा दिवसांत त्याच्याकडील एखादे तरी बोकड कमी झालेले असते.

पोल्ट्रीतील अंडी, कोंबड्यांसह मोकळ्या सोडलेल्या कोंबड्या पळविण्याचेही प्रकार याच टोळ्यांकडून होतात. कोणी जाब विचारण्याचा अथवा विरोध करण्याचा प्रयत्न केला तर त्याला मारहाण करून त्याच्याविरुद्धही खोट्या तक्रारी करण्यापर्यंत या टोळ्यांची मजल जाते. त्यामुळे सामान्य गरीब शेतकरी शक्‍यतो या टोळ्यांविरुद्ध तक्रार करण्याच्या भानगडीत पडत नाही. याचाच गैरफायदा घेऊन ही टोळकी दिवसेंदिवस अधिक आक्रमकपणे हे प्रकार करीत आहेत. 

डुकरे पळविणाऱ्या टोळीची अशीही शिरजोरी 
वड्डी गावाजवळ एका शेतात या टोळीने पकडलेल्या पन्नासभर डुकरांची प्राणीमित्रांनी सुटका केली. याचा गवगवा झाल्यावर वन विभागाचा कर्मचारी तेथे जाऊन चौकशी करू लागताच त्याच्याकडील मोबाईल काढून घेऊन त्यातील सगळा डाटा डिलीट करून त्याला तेथून हाकलून दिले. एवढे घडूनही संबंधित कर्मचाऱ्याने या टोळक्‍याविरुद्ध तक्रार नोंदविण्याचे धाडस दाखविले नाही. यावरूनच टोळक्‍याच्या शिरजोरीची कल्पना येते.

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com