आलं बुवा एकदाचं लिस्टमध्ये नाव.. कर्जाच्या खाईतून मुक्ती

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 February 2020

कोणत्याही कागदपत्राविना सरसकट दोन लाखापर्यंतचे कर्ज माफीचा निर्णय मुख्यमंत्री ठाकरे यांनी सोमवारी जाहीर केला. 

नगर तालुका ः कर्जमाफी होईल की नाही, झाली तर किती. एवढे करूनही आपले नाव येते की नाही याची धाकधुक शेतकरी वर्गात होती. मागील सरकारने केलेल्या अनुभवामुळे धडधड वाढत होती. परंतु प्रशासनाने आज नगर जिल्ह्यातील जखणगाव व ब्राह्मणी गावातील शेतकऱ्यांची कर्जमाफीची यादी लावली. त्यात नाव पाहून शेतकरी उदगारे आले बुवा नाव एकदाचं.. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद अोसंडून वाहत होता. मात्र, ज्यांची नावं आली नाही ते नाराज झाले.

नगर तालुक्‍यातील जखणगाव व राहुरी तालुक्‍यातील ब्राम्हणी या दोन गावांची यादी प्रसिद्ध झाली असल्याची माहिती जिल्हा उपनिंबधक दिग्विजय आहेर यांनी दिली. 

कोणत्याही कागदपत्राविना सरसकट दोन लाखापर्यंतचे कर्ज माफीचा निर्णय मुख्यमंत्री ठाकरे यांनी सोमवारी जाहीर केला. 

जखणगाव, ब्राह्मणीला लाभ

यात जखणगाव (ता.नगर) मधील 116 व ब्राम्हणी (ता. राहुरी) येथील 856 असे एकुण 972 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली. दुसऱ्या टप्यातील गावांची यादी 28 फेब्रूवारीपासून लावण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. जिल्हा सहकारी बॅंकेने प्रत्येक शाखेमध्ये कर्जदारांची बायोमेट्रीक पध्दतीचा पहील्यांदाच अवलंब केला. 

दोन दिवसांत येणार रक्कम 
दोन दिवसांत कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा होणार 
कर्जमाफीच्या पहील्या टप्यात नगर तालुक्‍यातील जखणगाव येथील 116 शेतकरी पात्र ठरले आहेत. पात्र शेतकऱ्यांचे अधार ऑथेंटीकेशन पूर्ण करण्यात येणार आहे. दुपार पर्यंत 25 शेतकऱ्यांचे अाधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.

ज्या शेतकऱ्यांचे खाते नॅशनलाईज बॅंकेत आहे, त्यांच्या खात्यावर दोन दिवसांत कर्जमाफीची रक्कम जमा होईल, तर ज्यांचे खाते जिल्हा बॅंकेत आहे, अशा शेतकऱ्यांची रक्कम तीन दिवसात खात्यावर जमा होईल

- उमेश पाटील, तहसीलदार नगर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers are delighted to be enrolled in the debt relief list