
लेंगरे (जि . सांगली) परिसरातील कारखान्यांचा गळीत हंगाम मोठ्या दिमाखात सुरू झाला. हंगाम संपत आला तरी कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला टोळी मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
लेंगरे (जि . सांगली) : परिसरातील कारखान्यांचा गळीत हंगाम मोठ्या दिमाखात सुरू झाला. हंगाम संपत आला तरी कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला टोळी मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. वारंवार ऊस नोंदणीबाबत दूरध्वनीवरून संपर्क साधूनही टोळी मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. कोरोना महामारीचे सावट असल्याने कारखान्याकडील ऊसतोड कमी प्रमाणात आल्याने हा सगळा सावळा गोंधळ सध्या सुरू आहे.
ऊसतोडी टोळी मिळविण्यासाठी एकरी आठ ते दहा रुपये मोजावे लागत आहेत. म्हणूनच शेतकरी संघटनांनी लक्ष घालून परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी ऊसतोडीला पैसे घेणाऱ्यांची धिंड काढण्याचा इशारा दिला असला तरी टोळी मालकांच्या पचनी हा इशारा कितपत पडतो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
परिसरात टेंभूचे पाणी आल्याने तसेच भागात पाऊसही चांगला झाल्याने उसाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. सध्या पूर्वीपासून ज्या भागात उसाचे प्रमाण जास्त आहे त्या भागात सध्या ऊसतोड सुरू आहे. इतर पिकांपेक्षा एकरकमी पैसे मिळणारे पीक म्हणून उसाकडे बघितले जाते. एकगठ्ठा पैसे येतील या आशेनेच इतर पिकांना बगल देत ऊस लागवड केली आहे.
आडसाली हंगामानुसार लागवड करून ऊस मोठ्या जोमात आणला आहे; परंतु कारखान्याच्या ढिसाळ कारभाराचा फटका मात्र या शेतकऱ्यांना बसण्यास सुरुवात झाली आहे. उसाची टोळी द्यावी यासाठी शेतकऱ्यांचे जथेच्या जथे कारखान्यावर जात आहेत; मात्र ऊस नोंदणी अधिकारी यांच्याकडून कोणतेही शाश्वत उत्तर मिळत नसल्याने शेतकऱ्यांत संभ्रमावस्था आहे. संबंधित अधिकारीही कुठलेही ठोस आश्वासन देत नसल्याने आपल्या उसाला तोड कधी मिळेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
परतीच्या पावसामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे उसाला आगाप तुरे पडण्यास सुरू झाल्यामुळे उसाची हिरवीगार दिसणारी शेती पांढरी दिसण्यास सुरुवात झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. उसाला तोड यावी यासाठी सध्या धडपड सुरू आहे. नोंदणी केलेल्या उसाला ऊसतोड द्यावी, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. ऊसतोडीतही राजकारण शिरल्यामुळे शेतकऱ्यांच्यातून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
ज्या कार्यकर्त्याचे उसाचे कांडेही नाहीत अशा लोकांनी तोडीत राजकारण आणून चालू तोडी बंद पाडण्याचा प्रताप केला आहे. त्यामुळे नेत्यावरही सामान्य शेतकऱ्यांची नाराजी आहे. यातच ऊस तोडण्यासाठी उसाचे फड पेटवा अन्यथा ऊस तोडणार नसल्याची भूमिका घेतल्याने ऊस उत्पादक शेतकरी पुरते अडचणीत सापडले आहेत.
संपादन : युवराज यादव