निपाणीत भाषेमुळे होतीये शेतकऱ्यांची कोंडी ; हे आहे कारण ?

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 August 2020

निपाणीसह सीमाभागातील मराठी भाषिक शेतकऱ्यांना ई-ॲप नोंदीचा उपक्रम जाचक वाटतो आहे. 

निपाणी : पीक पाहणीची नोंदणी शेतकऱ्यांनीच ई-ॲपद्वारे करण्याचे आवाहन कृषी खात्याच्या येथील रयत संपर्क केंद्राने केले आहे. त्याची अंमलबजावणी तालुक्‍यात झाली. ई-ॲपवर केवळ कन्नड भाषेतच माहिती नोंद करावी लागत आहे. इंग्रजी, हिंदीसह अन्य भाषेचा पर्याय खात्याने न ठेवल्याने निपाणीसह सीमाभागातील मराठी भाषिक शेतकऱ्यांना ई-ॲप नोंदीचा उपक्रम जाचक वाटतो आहे. 

निपाणी या मराठी बहुभाषिक तालुक्‍यातील अनेक शेतकऱ्यांनी खात्याकडे पर्यायी भाषा ठेवण्याची मागणी केली. ॲप निश्‍चितीचा विषय राज्य शासन पातळीवरचा आहे. मराठी भाषिक शेतकऱ्यांना कन्नड माहिती भरता येत नसल्याने कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांचीही डोकदुखी वाढली आहे. तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी कोणत्या पिकाची पेरणी किती प्रमाणात केली? याची माहिती ई-ॲपद्वारे नोंदणीचा उपक्रम खात्याने राबविला आहे.

हेही वाचा - वीज बिलाचा प्रश्न कॅबिनेटमध्ये मांडू : हसन मुश्रीफ...

निपाणी तालुक्‍यात त्याची अंमलबजावणी झाली. पण माहिती भरण्यासाठी शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद लाभत आहे. कारण एकतरी पीक पाहणीबद्दल शेतकऱ्यांमध्ये जागृती नाही. त्याचे फायदे, तोट्याबद्दल शेतकऱ्यांना अपुरी माहिती आहे. निपाणी भागातील २९ गावांत ५९ हजार ७४१ प्लॉटची नोंद कृषी खात्याकडे आहे. त्यातील जवळपास २ हजार ६८० प्लॉट्‌च्या शेतकऱ्यांनी ॲपवर माहिती भरली आहे. पीक विमा, किसान सन्मान योजना, बियाण्यांसाठी अनुदान अशा योजनांसाठी नोंदणीचा लाभ होऊ शकतो.

काही शेतकरी ॲपवर माहिती भरण्यास उत्सुक आहेत, पण ॲपमध्ये केवळ कन्नड भाषेतच माहिती भरण्याची व्यवस्था आहे. खरेतर कन्नडसोबत इंग्रजी, हिंदी अथवा सीमाभागासाठी मराठी भाषेचा पर्याय ठेवण्याची गरज होती. मात्र तसे न झाल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. यापूर्वी ग्राम निवासीकडून पीक पाहणी होत असे. यंदाही ज्यांच्याकडे ॲपची सुविधा असणारे मोबाईल नाहीत, अशा शेतकऱ्यांची ग्राम निवासी पीक पाहणी करणार आहेत. मात्र अँड्राईड मोबाईल असताना आणि पीक पाहणीस उत्सुक असणाऱ्या शेतकऱ्यांचीही भाषेमुळे कोंडी झाली आहे. खात्याने ‘मराठी’तही ई-ॲपची सोय करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. 

हेही वाचा -  प्रविण तरडेंना अटक करा ; कोणी केली मागणी

"ई-ॲपवर कन्नडमध्येच पीक पाहणीची माहिती भरण्याचा पर्याय आहे. माहिती भरताना अडचणी येत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. ज्यांना माहिती भरणे कठीण आहे, अशा शेतकऱ्यांची माहिती ग्राम निवासी भरतील."

- पुरुषोत्तम पिराजे, कृषी अधिकारी, निपाणी

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmers crop registration language is kannada only on E app in nipani belgaum