शेतकरी पुन्हा सावकारीच्या विळख्यात : पलूस तालुक्‍यातील स्थिती

संजय गणेशकर
Monday, 21 December 2020

पलूस तालुक्‍यातील बेकायदा खासगी सावकारीची पाळेमुळे ग्रामीण भागातही खोलवर गेली आहेत. शासनाने मोकाट सुटलेल्या, बेकायदा सावकारांवर कडक कारवाई करावी, सावकारीचा बीमोड करावा, अशी मागणी होत आहे. 

पलूस (जि. सांगली) ः पलूस तालुक्‍यातील बेकायदा खासगी सावकारीची पाळेमुळे ग्रामीण भागातही खोलवर गेली आहेत. शासनाने मोकाट सुटलेल्या, बेकायदा सावकारांवर कडक कारवाई करावी, सावकारीचा बीमोड करावा, अशी मागणी होत आहे. 

पलूस तालुक्‍यात शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात बेकायदा सावकारीचे पीकच आले आहे. बॅंका, पतसंस्था, सोसायट्या यांच्या सध्या नियम व अटी अधिक जाचक बनल्या आहेत. आर्थिक संस्था सध्या सहजासहजी कोणाला कर्ज देत नाहीत. तर आर्थिक संकटात सापडल्याने बॅंकांची थकबाकी राहिल्याने नव्याने कर्ज मिळत नाही अशी परिस्थिती आहे. या परिस्थितीचा नेमका गैरफायदा बेकायदा खासगी सावकार उचलत आहेत. मुलांचे शिक्षण, विवाह, दवाखाना व इतर महत्त्वाच्या कामासाठी नाईलाजाने लोकांना खासगी सावकारांकडे जावे लागते.

अगदी पाच टक्‍क्‍यापासून पंधरा ते वीस टक्‍क्‍या पर्यंत मासिक व्याजदाने हे सावकार गरजू लोकांना कर्ज देत असतात. मोठ्या प्रमाणावर व्याज आकारणीमुळे कर्जदार मुद्दल दूरच मात्र, व्याजही भरू शकत नाहीत. मग हे सावकार वसुलीसाठी गुंडगिरी करत असल्याचे प्रकार घडत आहेत. कर्जदारांना घरी जाऊन मारहाण, शिवीगाळ करण्यापासून ते जीवे मारण्याची धमकी देण्यापर्यंत या गुंड सावकारांची मजल गेली आहे. या सावकारांवर कोणाचेही नियंत्रण नाही.

काही सावकार कर्जदारांना धमक्‍या देऊन त्यांची जागा, शेतजमीन, घरे आपल्या नावावर करून घेत आहेत. बेकायदापणे कोरे धनादेश घेऊन लूट केली जात आहे. या मोकाट सावकारांकडून होणारा अन्याय कर्जदार निमूटपणे सहन करत आहेत. सावकारांच्या दहशतीमुळे कोणीही कर्जदार पोलिसांत तक्रार देण्यास पुढे येत नाहीत. तक्रार देण्यास कोणी गेले तर मध्यस्थीद्वारे त्याला थांबवले जाते. सोने तारण घेऊन सावकारीचा परवाना असणारे सावकारही जादा व्याज आकारणी करीत आहेत. या बेकायदा सावकारांवर कधी कारवाई होणार ? असा सवाल विचारला जात आहे. 

पठाणी व्याज आकारणी 
खासगी सावकारांकडून पाच टक्‍क्‍यापासून वीस टक्‍क्‍यापर्यंत शेकडा मासिक व्याज आकारणी करण्यात येत आहे. ही पठाणी व्याज वसुली गुंडगिरी करून केली जात आहे. या मोकाट सुटलेल्या सावकारांच्या घरावर संबंधित खात्याने माहिती घेऊन छापे टाकावेत, अशी मागणी होत आहे. 

सावकारांवर तक्रारीनंतर लगेच गुन्हे

बेकायदा सावकारांकडून अन्याय होत असल्यास पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी. सावकारांवर तक्रारीनंतर लगेच गुन्हे दाखल करण्यात येतील. 

- विकास जाधव, सहा. पोलिस निरीक्षक, पलूस

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers in the grip of moneylender again: Situation in Palus taluka