दराअभावी कोल्हापूर, सांगलीतील शेतकऱ्यांनी झेंडू ओतला घाटात

दराअभावी कोल्हापूर, सांगलीतील शेतकऱ्यांनी झेंडू ओतला घाटात

इचलकरंजी - मुंबई बाजारपेठेत झेंडूची विक्रीच ठप्प झाल्याने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील अनेक शेतकऱ्यांनी ट्रकने मुंबईकडे जाणारा झेंडू कात्रज आणि खंबाटकी घाटात ओतल्याचा प्रकार पुढे आला आहे. यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील शेतकरी हवालदिल झाले आहेत.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात उसाबरोबर भाजीपाला आणि फुलांची शेतीही मोठ्या प्रमाणात केली जाते. विशेषत: झेंडू फुलासाठी गणपती ते दिवाळीदरम्यान मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्याचबरोबर मुंबई बाजारपेठेत १२ महिने झेंडूला चांगली मागणी असते. त्यामुळे अनेक शेतकरी नगदी पीक म्हणून आणि कमी कालावधीत येणारे उत्पन्न या आशेने झेंडूची लागवड करतात.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात सुमारे एक हजार एकरहून अधिक क्षेत्रावर हे पीक घेतले जाते. गणपतीत झेंडूला स्थानिक बाजारपेठेबरोबरच मुंबई बाजारपेठेतही मोठी मागणी असते. अनेक शेतकरी करार करून या कालावधीत नियमितपणे झेंडू मुंबई बाजारपेठेत पाठवतात. मुंबईतील काही व्यापारी दर निश्‍चित करून अनेक शेतकऱ्यांकडून झेंडूची खरेदी करतात. या कालावधीत दरात चढउतार झाले तरी शेतकऱ्यांना निश्‍चित भाव देण्यास अनेक व्यापारी तयार असतात. अशा व्यापाऱ्यांकडे शेतकरीही मोठ्या प्रमाणात झेंडूचा पुरवठा करतात. १५ ते २० रुपये किलो दराने असणारा झेंडू मुंबईत ३० रुपये किलोने घेतला जात होता. गणपती उत्सवात हा दर घसरला होता. तो २५ रुपयांपर्यंत खाली आला.

दसरा सणाच्या निमित्ताने तसेच नवरात्र काळातही मोठ्या प्रमाणात झेंडूला मागणी असते. यावेळी किरकोळ विक्री ७० ते ८० रुपये किलोने, तर व्यापाऱ्यांकडून घाऊक खरेदी ४० ते ५० रुपयांनी झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र, दसऱ्यानंतर मुंबईतील व्यापाऱ्यांनी अचानक ‘झेंडू पाठवू नये,’ असा निरोप दिला. अनेक शेतकऱ्यांनी पाठवलेली वाहने काय करायची, असा प्रश्‍न विचारला त्यावेळी पुन्हा वाहतूक खर्च वाढण्यापेक्षा आहे तेथेच ट्रकमधील झेंडू ओतून वाहने परत फिरवावीत, असा सल्ला त्यांना देण्यात आला. सातारा ते पुणे दरम्यान असणारी अनेक वाहने अक्षरश: घाटामध्येच फुले ओतून परतली. यामध्ये शेतकऱ्यांना मोठा फटका बसला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com