छप्पर फाडके नुकसान भरपाई जमा, कसली ते वाचा...

नागेश गायकवाड
गुरुवार, 16 जानेवारी 2020

अवकाळी नुकसान अनुदान वाटपात आटपाडी तालुक्‍यात मोठा गडबड झाला आहे. एकट्या कुरुंदवाडीत चवेचाळीसवर शेतकऱ्यांना एकूण आणि बाधित क्षेत्र आणि मंजूर नुकसान भरपाईपेक्षा अनेकांना जादा, दुप्पट-तिप्पट रक्कम दिली आहे.

आटपाडी : अवकाळी नुकसान अनुदान वाटपात आटपाडी तालुक्‍यात मोठा गडबड झाला आहे. एकट्या कुरुंदवाडीत चवेचाळीसवर शेतकऱ्यांना एकूण आणि बाधित क्षेत्र आणि मंजूर नुकसान भरपाईपेक्षा अनेकांना जादा, दुप्पट-तिप्पट रक्कम दिली आहे. एका कुरूलवाडीत मंजुरी पेक्षा अडीच लाखांचे अधिक वाटप केले आहे. असाच प्रकार इतर गावांतही घडल्याचे उजेडात येऊ लागले आहे. 

या वर्षी ऑक्‍टोबर महिन्यात आटपाडी तालुक्‍यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. नुकसानभरपाईसाठी सरकारने हेक्‍टरी आठ हजार आणि फळबाग साठी हेक्‍टरी 18 हजार नुकसान भरपाईचा निर्णय जाहीर केला. त्याप्रमाणे तालुक्‍यात तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांच्या तीन सदस्यीय समितीने नुकसानीचे पंचनामे केले. शेवटच्या टप्प्यात वेळ कमी राहिल्यामुळे अनेक गावांत गडबडीत आणि एका एकाने पंचनामे केले. पंचनाम्याच्या याद्या सरकारला पाठवल्या आणि नुकसानभरपाई मंजूर झाली.

तालुक्‍यात कुरुंदवाडी येथील चवेचाळीसवर शेतकऱ्यांच्या झरे जिल्हा बॅंकेच्या शाखेत नुकसान भरपाई मंजूरपेक्षा ज्यादा पाठवल्या आहेत. शेतकऱ्याचे एकूण क्षेत्र, बाधित क्षेत्र आणि नुकसानीस पात्र झालेली रक्कम एक असताना प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या बॅंकेतील खात्यावर ज्यादा पैसे पाठवले आहेत.

एकट्या कुरुंदवाडीत अडीच लाख रुपयांवर ही रक्कम आहे. याशिवाय छोट्या-छोट्या गावात असा प्रकार घडला आहे. मंजूर रकमेपेक्षा जादा नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केल्यामुळे गडबड उजेडात आली आहे. तसेच अनेक गावांतील अनेक शेतकरी अनुदानपासून वंचित आहेत. जादा पैसे पाठवल्यामुळे सारा व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चौकशी करण्याची गरज आहे तरच या घटनेतील मुळापर्यंत पोहोचता येईल. 

9 चे झाले 28 
कुरुंदवाडी येथील एका शेतकऱ्याला नऊ हजार रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली असताना जिल्हा बॅंकेच्या शाखेत त्याच्या खात्यावर 28 हजार रुपये जमा केले आहेत, असे अनेक शेतकऱ्यांबाबत झाले. 

पैसे काही शेतकऱ्यांच्या खात्यात चुकून गेले
मंजुरीपेक्षा जादा पैसे काही शेतकऱ्यांच्या खात्यात चुकून गेले आहे. कम्प्युटरच्या एक्‍सल सॉफ्टवेअरच्या चुकांमुळे हा प्रकार घडला असून ज्यादा गेलेले पैसे परत घेऊन कमी गेलेल्या पैशांना देण्याचे काम सुरू केले आहे. 
- राहुल जितकर, आटपाडी तालुका कृषी अधिकारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers paid double Compensation in Atpadi of Sangali District

टॅग्स