शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा होणार होता, त्याचं काय झालं?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 जानेवारी 2020

कृष्णा-खोरेसाठी निधी द्यावा 
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेसाठी केंद्राकडून निधी मिळून कामास सुरवात व्हावी, तालुक्‍यातील रस्त्यांच्या कामासाठी 39 कोटी रुपये तसेच विजय गंगा अभियानासाठी व सिमेंट बंधाऱ्यांसाठी निधी मिळावा, अशा मागण्या केल्या. 

अकलूज (सोलापूर) : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 25 हजाराची मदत देणार होते, शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करणार होते, आश्‍वासनांची नुसती खैरात झाली; परंतु प्रत्यक्षात काय? असा प्रश्‍न उपस्थित करताना बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाशी या सरकारचे काहीच देणेघणे नाही, केवळ भाजपला दूर ठेवणे, एवढाच एककलमी कार्यक्रम या सरकारचा आहे, असा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (ता.12) येथे सरकारवर जोरदार प्रहार केला. 

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती 
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त भांबुर्डी येथील विजय गंगा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ, शिवामृत दूध संघाच्या आवारात (कै.) शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण, एक मेगावॅट सोलर प्रकल्पाचे उदघाटन, डाळिंब मार्केट इमारतीचे उदघाटन आदी विविध कामांचा प्रारंभ श्री. फडणवीस यांच्याहस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार रणजितसिंह निंबाळकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार पृथ्वीराज देशमुख, जयकुमार गोरे ,सचिन कल्याणशेट्टी, राम सातपुते, माजी खासदार धनंजय महाडिक, बबनराव अवताडे, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, कल्याणराव काळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, सोलापूर शहराध्यक्ष विक्रम देशमुख, जयसिंह मोहिते पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील आदी यावेळी उपस्थित होते. 

हेही वाच - आम्ही धमक्यांना घाबरत नाही : फडणवीस

केवळ नि केवळ द्वेषाचे राजकारण 
श्री. फडणवीस म्हणाले, ""केवळ नि केवळ द्वेषाचे राजकारण सध्या सुरु आहे. आमच्या सगळ्या योजना बंद करण्याचा कार्यक्रम या सरकारने हाती घेतला आहे. जलयुक्त शिवारसारखी योजनाही बंद केली. पण ती जनतेच्या मनात रुजली आहे. त्याचे फायदे सर्वांना माहिती आहेत. सिंचनाच्या क्षेत्रवाढीसाठी ही योजना उपयुक्त होती. आम्ही सहकार क्षेत्राला बळकटी दिली, साखर कारखानदारी वाचविण्यासाठी दोन हजार कोटीची मदत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साखरेचा दर निश्‍चित केल्यामुळेच आज उसाला चांगला दर मिळत आहे.ऊसाला एफआरपीप्रमाणे दर मिळू लागला. पन्नास वर्षापूर्वीचा कायदा मोदीसरकाराने अंमलात आणला. अतिवृष्टीग्रस्तांना मदत देण्याबाबतही नुसतेच भुलवण्यात आले. आजही 25 हजाराची वाट शेतकरी पाहतायेत, कर्जमाफीबाबतही सरसकट सात-बारा कोरा करण्याचे आश्‍वासन दिले. पण दिलेली कर्जमाफी फसवी आहे. आमच्या काळात आम्ही 19 हजार कोटीची कर्जमाफी दिली, तर शेतकऱ्यांना विविध लाभातून थेट 50 हजार कोटीची मदत दिली. कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेसाठी केंद्राकडे पाठपुरावा करु.'' 

सहकार महर्षीनी सहकाराची मुहूर्तमेढ रोवली 
भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, ""सहकार महर्षीनी सहकाराची मुहूर्तमेढ रोवली. सहकार महर्षींनी सहकारी संस्था उभारून शेतकऱ्याची उन्नती करण्यासाठी प्रयत्न केला. सहकार चळवळ पक्की राहिली, तर विकास होतो हे या भागात आल्यानंतर लक्षात येते. सध्याच्या ठाकरे सरकारची कर्ज माफी योजना फसवी असून, पक्षभेद विसरून लोक या सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरू लागले आहेत, यावरुनच सरकारचे काम आपल्या लक्षात येईल.''  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The farmers seven-twelfth