भाव नसल्याने झेंडू फेकला बांधावर ; शेतकरी अडचणीत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

जांब येथील शेतकरी सुखदेव शिंदे यांनी झेंडूच्या फुलांना दर नसल्याने चार एकर शेतात धरलेल्या झेंडूची फुले शेताच्या बांधावर फेकून दिली.

खटाव ः यंदा झेंडू हंगाम बहरात आला असून, ऐन सण व उत्सवाच्या काळातच फुलांचा भाव पडला आहे. ठोक बाजारामध्ये झेंडूच्या फुलांना किलोमागे केवळ पाच रुपये दर मिळत असल्याने फूल उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. फुलांच्या उत्पादनाचा खर्चही सुटत नसल्याने जांब येथील शेतकऱ्यांनी फुलांना बाजार दाखवण्यापेक्षा नैराश्‍यापोटी शेताच्या बांधावर फेकून दिली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक अडचणीत आले आहेत. 

ऐन दुष्काळाच्या काळात लेकरांची काळजी घ्यावी, तशी काळजी घेऊन बहरात आणलेल्या फुलांना बाजार दाखवण्याऐवजी फुले बांधावर फेकावी लागल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. यंदा झेंडूचा हंगाम बहरात आला आहे. मात्र, मुंबई, पुण्याला केवळ राज्यातूनच नव्हे, तर परराज्यातूनही फुलांची आवक वाढल्याने दर कोसळले आहेत. शिवाय सध्या महाळाचा पंधरवडा असल्याने फुलांची मागणी घटली आहे. भाव नसल्याने ही फुले तशीच ठेवणे शक्‍य नसल्याने शेतकऱ्यांनी ती फेकून देण्यास सुरवात केली आहे.

गणेशोत्सवामध्ये व श्रावणातही समाधानकारक भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. भाव मिळत नसल्याने फुले विकता येत नाहीत. तयार झालेली फुले झाडावर ठेवणेही शक्‍य नाही. शिवाय फुले तोडण्यासाठी लागणाऱ्या कामगारांचा रोज, वाहतूक खर्च, ऐन दुष्काळात फुलांना विकतचे पाणी पाजल्याचा खर्चही निघत नाही. कवडीमोल दराने फुले विकल्यावर केलेले कष्ट तर जाऊद्या; पण केलेली गुंतवणूकही निघत नसल्याने फुले तोडून शेताच्या बाहेर फेकून देणे एवढाच आमच्याकडे पर्याय शिल्लक राहिला आहे, अशी व्यथा जांब (ता. खटाव) येथील प्रगतशील शेतकरी सुखदेव शिंदे यांनी "सकाळ'शी बोलताना मांडली. 

दसऱ्यात दरवाढ शक्‍य 

खटाव परिसरात झेंडू फुलांची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. यंदा दुष्काळग्रस्त स्थितीही शेतकऱ्यांनी फुलांची जोपासना केली. दर वर्षी उत्सव काळात फुलांना शंभर रुपये किलोच्या पुढे भाव जातो. मात्र, सध्या पाच रुपये किलो भाव असल्याने त्यातून तोडणी व वाहतूकही परवडत नाही. तथापि, दसरा उत्सवाच्या काळात फुलांच्या दरात वाढ होईल, अशी अपेक्षा धरून काही शेतकरी झेंडूची जोपासना करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers in trouble due to low price for flowers