
साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होऊन दोन महिने होत आले. तरीही तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या आडसाली उसाला अद्याप तोड मिळालेली नाही.
कडेगाव (जि. सांगली) : साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होऊन दोन महिने होत आले. तरीही तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या आडसाली उसाला अद्याप तोड मिळालेली नाही. त्यामुळे ऊस तोडीसाठी शेतकऱ्यांना कारखान्यांच्या गट ऑफिसला चकरा मारण्याची वेळ आली आहे.
सोनहिरा व उदगिरी शुगर्स या दोन कारखान्यानी एकरकमी एफआरपी दिली आहे.त्यामुळे त्यामुळे या कारखान्यांकडेऊस पाठविण्यासाठी तालुक्यातील शेतकरी आग्रही आहेत.तर क्रांती, सह्याद्री, कृष्णा, ग्रीन पॉवर शुगर्स आदी कारखान्यांच्या ऊस तोडी तालुक्यात
सुरू आहेत. मात्र तालुक्यातील उसाची मोठ्या प्रमाणात असलेली उपलब्धता लक्षात घेता कारखान्यांच्या प्रशासनाने ऊसतोड मजुरांच्या टोळ्या योग्य त्या प्रमाणात उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. यामुळे ऊसतोडीचा प्रोग्राम कोलमडला आहे. त्यामुळे ऊसतोडीसाठी शेतकऱ्यांवर कारखान्यांचे गट अधिकारी व चिटबॉयकडे विनवण्या करण्याची वेळ आली आहे.
ऊसतोड टोळ्यांअभावी सगळीकडेच चांगल्या कारखान्यांच्या ऊसतोड कार्यक्रम कोलमडलेला आहे आणि कारखाना यंत्रणा अडचणीत सापडल्या आहेत, हे खरे असले तरी कार्यक्षेत्रातील ऊस प्राधान्याने उचलने कारखान्यांचे कर्तव्य आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. आपला ऊस वेळेत गाळपासाठी जावा यासाठी ऊस उत्पादकांची धडपड सुरू असल्याचे चित्र तालुक्यात सर्वत्र दिसत आहे.
"कृष्णा'ची तोडणी यंत्रणा वाढवा
यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखान्याचे तालुक्यातील 23 गावांत कार्यक्षेत्र आहे, सभासद संख्याही मोठी आहे. मात्र तरीही या कारखान्याने या तालुक्यात उशिरा आणि कमी टोळ्या दिल्या आहेत. त्यामुळे येथील सर्व सभासदांचा ऊस कृष्णेला जाणे अशक्य आहे. तेव्हा कारखान्याने तालुक्यात ऊस तोडणी टोळ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी तालुक्यातील सभासद वर्गातून जोर धरू लागली आहे.
संपादन : युवराज यादव