माधवनगरच्या सावकार पितापुत्रास अटक...कर्जवसुलीसाठी कुटुंबातील चौघांना मारहाण 

घनश्‍याम नवाथे
Friday, 11 September 2020

सांगली-  खासगी सावकारीतून दिलेल्या रकमेच्या वसुलीसाठी बुधगाव (ता. मिरज) येथे घरात घुसून कर्जदार, पत्नी, मुलगा व सुनेला अश्‍लिल शिवीगाळ करून काठी व हाताने मारहाण केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी सौ. विमल तुकाराम बंडगर (वय 68, रा. जोतिबानगर, बुधगाव) यांनी माधवनगरातील सावकार दिनकर पांडुरंग साळुंखे (वय 64) व मुलगा शंभुराज दिनकर साळुंखे (वय 33, रा. विठ्ठल रूक्‍मिणी मंदिराजवळ) या दोघांविरूद्‌ध फिर्याद दिली आहे. सांगली ग्रामीण पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधवगाव येथील तुकाराम बंडगर व पत्नी विमल बंडगर हे शेतमजुरी करतात. तुकाराम यांनी आर्थिक अडचणीतून 2014 मध्ये सावकार साळुंखे यांच्याकडून कर्ज घेतले होते. साळुंखे यांनी बेकायदेशीर व्याजाने रोख रक्कम देऊन बेकायदेशीर सावकारी व्यवहार केला होता. कर्जाच्या वसुलीसाठी साळुंखे पिता-पुत्रांनी वारंवार बंडगर कुटुंबाकडे तगादा लावला होता. तुकाराम यांनी गेल्या सहा वर्षात वेळोवेळी साळुंखे यांना पैशाची परतफेड केली होती. कर्जाची रक्कम व व्याजाची रक्कम वसुल करून देखील पिता-पुत्र बंडगर कुटुंबियांना वारंवार धमकावत होते. पैशाची परतफेड केली तरी आणखी रक्कम येणे असल्याचे सांगून तगादा लावला होता. त्यामुळे बंडगर कुटुंबिय घाबरले होते. 

बुधवारी (ता.9) सायंकाळी देखील पितापुत्र बंडगर यांच्या घरात घुसले. तुकाराम, पत्नी विमल, मुलगा अनिल आणि सून गौरी यांना अश्‍लिल शिवीगाळ केली. तसेच काठीने व हाताने मारहाण करून धमकी व दमदाटी केली. याप्रकरणी सौ. विमल यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेतली. सावकार पितापुत्राविरूद्‌ध घरात घुसून मारहाण, शिवीगाळ, दमदाटी केल्याबद्दल तसेच सावकारी अधिनियमानुसार गुरूवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून साळुंखे पितापुत्राला अटक केली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Father-son of Madhavnagar moneylender arrested. Four members of the family beaten for debt recovery