बापाचा टाहो, मलापण दवाखान्यात न्या!... वाचा काय झाले

अजित झळके
Wednesday, 15 July 2020

हातात कपड्यांची पिशवी घेऊन त्यानं घरातनं पाय बाहेर ठेवला... त्याची पाठमोरी आकृती बघून बापानं टाहो फोडला...

सांगली (जि . सांगली) ः हातात कपड्यांची पिशवी घेऊन त्यानं घरातनं पाय बाहेर ठेवला... त्याची पाठमोरी आकृती बघून बापानं टाहो फोडला... आई हमसून हमसून रडायला लागली... माझ्या पोराला एकट्याला नेऊ नका ओ... मला पण कोरोना झालाय की पुन्हा तपासून बघा... मलापण त्याच्याबरोबर येऊ द्या... बापाचे हे शब्द ऐकूण अख्खी गल्ली रडायला लागली. 

मिरजेतील रेवणी गल्लीत दुपारी बाराच्या सुमारास हृदय पिळवटून टाकणारा हा क्षण घडला. बापाची समजूत कशी काढायची, हे आरोग्य कर्मचाऱ्यांना कळेना. पण, मनावर दगड ठेवून त्यांनी मुलाला रुग्णवाहिकेत बसवले आणि ती थेट कोरोना रुग्णालयाकडे रवाना झाली. 

मिरजेतील रेवणी गल्लीतील एका भाडेकरूला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गेल्या दोन दिवसांत तेथे रुग्णसंख्या वाढत आहेत. त्यातील काहीजणांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले होते. त्यातील एका बारा वर्षाच्या मुलाची तपासणी पॉझिटिव्ह आली. त्याच्या आईवडिलांना कोरोना झाला नाही. त्यामुळे फक्त मुलाला रुग्णालयात जावे लागणार होते.

त्यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी, आशा वर्कर्स गल्लीत दाखल झाले. त्यानंतर मुलाच्या वडिलांनी हंबरडा फोडला. त्यांचा त्याच्यावर एवढा जीव की त्याला एकट्याला ते जावूच द्यायला तयार नव्हते. माझी कोरोनाची पुन्हा तपासणी घ्या, मला कोरोना झालाय का बघा, मला त्याच्यासोबत जाऊ द्या, असा टाहो त्यांनी फोडला. मुलाच्या आईने हंबरडा फोडला. त्यामुळे धिराने पावले उचलणारा तो मुलगा अडखळला आणि त्याच्या डोळ्यातूनही अश्रूधारा लागल्या, मात्र "मी लवकरच येईन', असे भरल्या डोळ्यांनी आश्‍वस्त करत तो रुग्णवाहिकेत बसला आणि रुग्णालयाकडे रवाना झाला. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Father started crying while health personel taking the child to the hospital