सांगलीतील व्यापारी लाकॅडाऊन करण्याबाबत अनुकूल 

बलराज पवार 
Monday, 7 September 2020

लाकॅडाऊन करण्याबाबत उलटसुलट चर्चा सुरु असताना व्यापारी एकता असोसिएशनने यासाठी अनुकूलता दर्शवली आहे.

सांगली : महापालिका क्षेत्रात आणि जिल्ह्यात कोरोनाचा समूह संसर्ग वाढत चालला आहे. त्यातच सांगलीचा मृत्यू दरही काळजीत टाकणारा आहे. अशा परिस्थितीत रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी आवश्‍यक यंत्रणा अपुरी आहे. त्यामुळे लाकॅडाऊन करण्याबाबत उलटसुलट चर्चा सुरु असताना व्यापारी एकता असोसिएशनने यासाठी अनुकूलता दर्शवली आहे. त्यासाठी उद्या (ता. 7) संघटनेचे पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून चर्चा करणार आहेत. 

व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा म्हणाले,""कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. समूह संसर्ग सुरु झाला आहे. याच्याशी लढताना रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी आवश्‍यक यंत्रणा अपुरी आहे असे दिसते. सध्या जिल्ह्यातील अनेक गावात जनता कर्फ्यू पाळल्याने जवळपास 75 टक्के जिल्हा बंद आहे. आम्ही आत्तापर्यंत सर्वच उपाययोजनांना अनुकूलता दर्शवली आहे. गेल्या आठवड्यात प्रशासनाला निवेदन देऊन लॉकडाऊन विरोध दर्शवला नव्हता. पण, हा अंतिम पर्याय निवडावा, असे नमूद केले होते. 

ते म्हणाले,""व्यापारी लॉकडाऊनसाठी अनुकूल आहेत. संघटनेचे पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांची उद्या (ता.7) भेट घेऊन चर्चा करणार आहे. सध्या बाजारात दिसणारी गर्दी पाहता जनता स्वयंस्फूर्त बंद पाळेल, असे वाटत नाही. त्यामुळे लॉकडाऊन करावे, अशी आमची मागणी राहणार आहे.'' 

सर्वपक्षीय कृती समितीही तयार 
सर्वपक्षीय कृती समितीनेही लॉकडाऊनसाठी तयारी दर्शवली आहे. समितीचे नेते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले,""जिल्ह्यातील कोरोनाची गंभीर स्थिती पाहता सद्यस्थितीत कडक लॉकडाऊन करण्याची गरज वाटते. या काळात प्रशासनाने रुग्णांची संख्या पाहता उपचाराची यंत्रणा उभी करावी. सांगलीत जंबो कोविड हॉस्पिटल तसेच तालुका स्तरावर व्हेंटीलेटर, ऑक्‍सिजनची सुविधा उपलब्ध करावी.'' 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Favorable to lock down traders in Sangli