एड्‌स पेक्षा कोरोना ची भीती वाटते; वारांगणावर उपासमारीची वेळ

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 June 2020

वीस एक वर्षापूर्वी जगभरात एड्‌स रोगाने थैमान घातले होते. त्यावेळी जेवढी भीती वाटली त्यापेक्षा अधिक भीती या "कोरोना'ची वाटते. सुंदरनगरमधील वेश्‍या वस्तीतील महिलांनी ही भीती व्यक्त केली.

सांगली : वीस एक वर्षापूर्वी जगभरात एड्‌स रोगाने थैमान घातले होते. त्यावेळी जेवढी भीती वाटली त्यापेक्षा अधिक भीती या "कोरोना'ची वाटते. सुंदरनगरमधील वेश्‍या वस्तीतील महिलांनी ही भीती व्यक्त केली. साठ दिवसांपासून असणाऱ्या लॉकडाऊनमुळे वेश्‍यांवर उपासमारीची वेळी आली असून जगण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणीही त्या महिलांनी पोटतिडकीने व्यक्त केली. जागतिक "सेक्‍स्‌ वर्कर्स डे'निमित्त वेश्‍या वस्तीतील महिलांशी साधलेला हा संवाद. 

22 मार्चला लॉकडाऊन जाहीर झाला अन्‌ ही वस्ती "लॉक' झाली. इथल्या गल्ल्यांना, उंबऱ्यांना भलतीच धास्ती जाणवायला लागली. पंचवीस वर्षांपूर्वी अशीच एक अनामिक भीती एचआयव्ही एड्‌सच्या निमित्ताने या गल्ल्यांना हादरवून गेली होती. तेव्हाही उपासमार झाली होती. कालांतराने सुरक्षिततेची साधने आली आणि जागृती झाली. पुन्हा गल्ल्या सावरल्या. एड्‌सची भीती राहिली मात्र, त्यासोबत जगायला इथल्या महिल्या शिकल्या. त्यापैकीच दोघींनी आज "सकाळ'शी बोलताना भावनांना वाट मोकळी करून दिली. 

कोरोना संकटाच्या दोन महिन्यांतील आपबिती सांगताना त्यांचे डोळे पाणावले. या दोन महिन्यांपैकी बराच काळ आम्ही एकवेळ खाऊन जगलो. हे सांगताना त्या सुन्न झाल्या. कोरोना संपेल का? जग पुन्हा धावायला लागेल का, हे प्रश्‍न खूप मोठे आहेत. या गल्ल्यांकडे लोकांची पावले वळतीलही पण, कोरोनाची भीती मनातून जाणार नाही. सोशल डिस्टन्स आम्ही कसा पाळायचा? सॅनिटायझर हातावर घालून विषय संपेल का? मास्क हा आमच्यातील आणि ग्राहकातील मुख्य अडथळा होणार असेल, तर उपाय काय करायाचा. या प्रश्‍नांना या गल्ल्यांना पछाडले आहे, असे त्या सांगत होत्या. 

वेश्‍या महिला एड्‌स निर्मूलन केंद्राच्या पुढाकारातून काही सामाजिक संस्था, महापालिका, दानशूर व्यक्तींनी जीवनावश्‍यक वस्तूंचे किट दिले. दीपक चव्हाण, सादीक शेख, इरफान दर्गा, कलाम अन्सारी, गौतम वाघमारे यांनी यासाठी पुढाकार घेतला. इथल्या सत्तर टक्के महिला कर्नाटक राज्यातील, तर काही कोलकत्ता, नेपाळ, उत्तर भारातील महिला इथे आहेत. दोन महिने कसेबसे सरले पण, पुढे काय? हे असेच सुरू राहिले, तर जगायचं कसे हा प्रश्‍न त्या महिलांसमोर उभा आहे. सरकार समाजातील विविध घटकांसाठी मदतीचा हा पुढे करते आहे. या शापीत भागाला जगण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अशी रास्त मागणी त्या महिलांची आहे. 

मानसिक शांतीसाठी मनोरंजन 
गेल्या दोन महिन्यांपासून उत्पन्न नाही. गावाकडे पाठवायला पैसे नाहीत. त्यामुळे इथल्या महिलांना नैराश्‍य आले आहे. यासाठीच वेश्‍या महिला एड्‌स निर्मूलन केंद्रामार्फत मनोरंजनासाठी खेळ, डान्स असे विविध उपक्रम राबविले जात आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fear OF Corona is more than AIDS; Say sex workers