महापुराची धास्ती अन्‌ बोटींना वाढती मागणी :सांगलीवाडीत बोट कारखान्यात लगबग

boat factory.jpg
boat factory.jpg
Updated on

सांगली-  गतवर्षी प्रलंयकारी महापुराच्या आठवणी विस्मरणात जाण्याआधी आता पुन्हा एकदा यंदाच्या महापुराची चर्चा पावसाळ्याच्या सुरवातीपासूनच होत आहे. नदीकाठच्या परिसरात त्यामुळे बोटींची मागणी वाढतेय. या बोटी बनवण्याचे केंद्र असलेल्या सांगलीवाडीतील बोटी बनवण्याच्या कारखान्यात सध्या मोठी लगबग वाढतेय. जुन्या बोटी दुरुस्त करणे, नव्या बोटींची प्रतीक्षा यादी वाढली आहे. 

गतवर्षीच्या महापुरात नेहमीच्या पारंपरिक नौकांबरोबरच फायबर बोटी, फेरी बोटींचा मदतकार्यासाठी चांगला उपयोग झाला. महापुराने थैमान घातले असताना अपुऱ्या बोटींमुळे मदत व बचाव कार्यात अनेक अडचणी आल्या. बोटीची कमतरता लक्षात घेत यंदा महापालिकेसह जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. सांगलीवाडीत प्रताप जामदार व विष्णू जामदार या बंधूंच्या कारखान्यात बोट निर्मितीसाठी वेटिंग आहे. पूरपट्ट्यातील 104 गावांत प्रशासनाने संभाव्य महापुराचा सामना करण्यासाठी बोटी देण्याचे नियोजन केले आहे.

सागाव, कोकरुड, आरळा, भरतवाडी, गौडवाडी, वाळवा, शिरगाव, हरिपूर, अंकली, मौजे डिग्रज, माळवाडी, भिलवडी, ब्रम्हनाळ, आमणापूर, धनगाव, तावदरवाडी या गावांना जिल्हा परिषदेमार्फत बोटी देण्याचे नियोजन आहे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या 4 बोटीही याच कारखान्यात तयार होत आहेत. संभाव्य पुराची तयारी म्हणून संस्था, संघटना तसेच वैयक्‍तिक मालकीच्या बोटी यंदा खरेदी करण्याकडे लोकांचा कल आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून या बोटींची रचना, आकार, वजन ठरवले जाते. जुन्या बोटींच्या दुरुस्तीसाठीही ग्रामपंचायती सरसावल्या आहेत.

लॉकडाउनचा फटका यंदा बोट कारखान्यालाही बसला. सागवान लाकूड, फायबर, केमिकल, हस्ती पाईप, कलर, स्टील ग्रेलिंग या वस्तूंच्या दरातील वाढीचा परिणाम या व्यवसायावर झाला आहे. सुट्या भागाचे दर साधारणपणे 10 ते 15 टक्‍क्‍यांनी वाढले आहेत. पाच माणसे बसणाऱ्या बोटींची गतवर्षीची किंमत 40 हजार रुपये होती. ती 55 हजार रुपयांपर्यंत जाउन पोचली आहे. इंजिनच्या किंमतेही भरमसाठ वाढल्या आहेत. माणसाच्या बैठक क्षमतेनुसार बोटीचा आकार पाहून किंमती ठरत असल्याचे श्री. जामदार यांनी सांगितले. 

बोटनिर्मिती क्षेत्रात सांगलीवाडी पॅटर्न 
सांगलीवाडी येथील रॉयल कृष्णा बोट क्‍लबचे संस्थापक असणाऱ्या प्रताप जामदार यांनी गतवर्षीच्या महापुरात सुमारे 20 हजार लोकांना पाण्याबाहेर काढले. नदीकाठी राहणाऱ्या जामदार यांना पाण्यासह बोटबांधणीचा गेल्या तीस वर्षांचा अनुभव आहे. सातारा येथील कोयना जलाशयात दोन मोठ्या मालवाहतूक गाड्या वाहून नेण्याची क्षमता असलेले लॉन्ज त्यांनी तयार केले आहे. गोवा येथील किनाऱ्यावरील बहुतांश बोटी सांगलीवाडी येथील आहेत. सांगलीसह सातारा, कोल्हापूर, जिल्ह्यातील वन विभाग, जिल्हा परिषदेच्या बोटी येथेच तयार होतात. अलमट्टी तसेच कोयना धरणक्षेत्रातील पुनर्वसित दुर्गम गावांनाही जामदार यांच्या बोटीचा मोठा आधार आहे. सांगलीवाडी येथे सुमारे 6 बोटक्‍लब कार्यरत असून पूरकाळात ते अखंड सेवा देतात. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com