एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारे चोरटे पोलिसांमुळे पसार

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 25 ऑगस्ट 2019

- अशोक चौक पोलिस चौकी परिसरातील तीन एटीएम सेंटर फोडण्याचा प्रयत्न रविवारी पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला आहे.

- या प्रकरणात चोरटे पसार झाले आहेत.

- सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजवरून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे.

सोलापूर : अशोक चौक पोलिस चौकी परिसरातील तीन एटीएम सेंटर फोडण्याचा प्रयत्न रविवारी पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला आहे. या प्रकरणात चोरटे पसार झाले आहेत. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजवरून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे.

अशोक चौक पोलिस चौकी परिसरात जीन्स कॉर्नर येथे एसबीआय बॅंकेच्या शेजारी तीन एटीएम सेंटर आहेत. रविवारी पहाटे दोनच्या सुमारास चोरटे एटीएम सेंटर फोडत होते. त्यावेळी अशोक चौक परिसरात रात्रगस्तीला असणारे पोलिस नाईक मेहंदी आणि चालक हवालदार भारत रोकडे यांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी तत्काळ एटीएम सेंटरकडे धाव घेतली. पोलिस येत असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी सर्व वस्तू तिथेच टाकून पलायन केले. पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोठा अनर्थ टळला. एटीएम सेंटरमध्ये सुमारे 30 लाख रूपये असल्याची माहिती समोर आली आहे. 

चोरीच्या तयारीने आलेल्या चोरट्यांकडे स्प्रे, कटर, ग्लोज यासह एटीएम फोडण्याचे साहित्य आढळून आले. सर्व आरोपी सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहेत. त्यावरून जेल रोड पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

"रविवारी पहाटेच्या सुमारास एटीएम सेंटर फोडण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांनी पळ काढला. काही संशयितांना ताब्यात घेतले होते, चौकशीनंतर त्यांना सोडून दिले. चोरट्यांचा शोध सुरु आहे." 
- संजय जगताप, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fearing police thieves trying to rob atm ran away