esakal | वाह रे पठ्ठ्या! रिक्षाचालकाच्या मुलाने पटकावली 2 कोटीची फेलोशिप, राज्यातील पहिलाच

बोलून बातमी शोधा

fellowship received by a nipani students rupees 2 crores for research in belgaum}

ही शिष्यवृत्ती मिळविणारे ते महाराष्ट्र-कर्नाटक राज्यातील पहिले मानकरी ठरले आहेत.

वाह रे पठ्ठ्या! रिक्षाचालकाच्या मुलाने पटकावली 2 कोटीची फेलोशिप, राज्यातील पहिलाच
sakal_logo
By
राजेंद्र हजारे

निपाणी (बेळगाव) : अलीकडच्या काळात शिक्षणाचे बाजारीकरण होत असल्याने सर्वसामान्य कुटुंबातील मुलांसमोर आव्हान उभे ठाकले आहे. अशा परिस्थितीत लखनापूर (ता. निपाणी) येथील सुरेंद्र रामचंद्र चौगुले या रिक्षाचालकाच्या मुलाने जागतिक पातळीवरील प्रतिष्ठित मैरी स्कोलोडोव्स्की क्युरी अॅक्शन्स ही तब्बल २ कोटी रुपयांची वैयक्तिक फेलोशिप पटकावली आहे. प्रा. डॉ. संदेश चौगुले असे या संशोधकाचे नाव आहे. ते राजस्थानमधील जयपूरच्या 'द एलएनएम इन्स्टिट्यूट ऑफ इंफार्मेशन टेक्नालॉजीमध्ये' सहाय्यक प्राध्यापक आहेत. त्यांच्या लख्ख यशामुळे निपाणी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ही शिष्यवृत्ती मिळविणारे ते महाराष्ट्र-कर्नाटक राज्यातील पहिले मानकरी ठरले आहेत.

प्रा. डॉ. संदेश चौगुले यांची कौटुंबिक परिस्थिती बेताचीच आहे. त्यामुळे वडील सुरेंद्र हे रिक्षा व्यवसाय तर आई मंगला या शिवणकाम करतात. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कोगनोळी, कागल व अर्जुननगर (ता. कागल) तर महाविद्यालयीन शिक्षण देवचंद कॉलेजमध्ये झाले. त्यानंतर कराड येथील सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयात बी. ई. आणि एम. टेक. पदवी घेतली. त्यानंतर विविध क्षेत्रात संशोधन करण्यासाठी त्यांनी अनेक पर्याय निवडले. 'नॅनो फ्लूड स्पेक्ट्रल बिम स्पिल्टिंग अस्सिटेड कॉन्सेंट्रिक फोटोओल्टाइक कलेक्टर' या विषयावर शोधप्रबंध दिला. त्यासाठी युरोपियन कमिशनकडून दोन कोटींची फेलोशिप जाहीर करण्यात आली आहे. या फेलोशिप अंतर्गत जगातील सर्वोच्च विद्यापीठांची आठवी संस्था असलेल्या जगप्रसिद्ध इम्पिरियल कॉलेज-लंडन येथे संशोधन करता येणार आहे. 

हेही वाचा - गोवा-कोल्हापुरात रंगले सांगली महापौर-उपमहापौर निवडणुकीचे नाट्य -

'नेनोफ्लॉइड स्पेक्ट्रल बीम स्प्लिटिंग असिस्टेंट कॉन्ट्रिक फोटोव्होल्टेइक कलेक्टर्स' वर संशोधन करणार आहेत. कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात असताना त्यांना नॅनोफ्लॉईड्सच्या संशोधनात रस निर्माण झाला. त्यानंतर त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंदौर येथून अडीच वर्षांत पीएच. डी. पदवी मिळविली. गेली ६ वर्षे जयपूरच्या द एलएनएम इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ते सध्या अनेक पीएच. डी. विद्यार्थ्यांचा मार्गदर्शन करत आहेत. त्यांना भारत सरकारकडून संशोधन अनुदानही मिळाले आहे. गेल्या वर्षी त्यांना आयएसटीई यंग रिसर्चर अवॉर्ड मिळाले आहे. कराड येथील प्राचार्य डॉ. अशोक पिसे व जयपूर येथील द एलएनएम आयआयटीचे राहुल बॅनर्जी यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल निपाणी तालुक्यात त्यांचे कौतूक होत आहे.

ग्रामीण विद्यार्थ्यांचे टॅलेंट

ग्रामीण भागातील अनेक प्रतिभावंत विद्यार्थी आहेत. पण त्यांना योग्यवेळी योग्य मार्गदर्शन लाभत नसल्याने पिछेहाट होत आहे. अशा परिस्थितीत न डगमगता कौटुंबीक स्थिती बेताचीच असतानाही लखनापूरच्या प्रा. डाॅ. संदेश चौगुले यांनी आपले ग्रामीण विद्यार्थ्यांची टॅलेंट सिद्ध केले आहे.

"नोकरी अथवा व्यवसाय हा दहावी आणि बारावीच्या गुणावर अवलंबून नाही. त्यामुळे या शैक्षणिक वर्षांमध्ये कमी गुण पडल्यास खचून न जाता विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचा मार्ग निवडून त्यामध्ये भविष्य घडवणेगरजेचे आहे. त्यासाठी जिद्द, परिश्रम आणि चिकाटीने अभ्यास करावा."

- प्रा. डाॅ. संदेश चौगुले, लखनापूर

हेही वाचा -  गुरगुरणारा बिबट्या बनला हिंसक; शेतात कसं जावं, घरी कसं रहावं -

संपादन - स्नेहल कदम