तिला लागल्या बाळंतकळा, पण एसटी बिघडली... मग हे घडलं

मार्तंड बुचुडे
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

पुण्याहून गावी अकोल्याकडे काल (रविवारी) गरोदर महिला खासगी बसने निघाली होती. अंगमेहनतीचे काम करणारी ती जवळ कसले आलेत जास्तीचे पैसे. पती अगोदरच गावी गेल्याने, ती एकटीच प्रवास करीत होती. दुर्दैवाने नगर-पुणे महामार्गावर सुपे "टोल'नाक्‍यावर बस अचानक बंद पडली.

पारनेर : रात्री सव्वाबाराची वेळ. ती एकटीच. सोबत घरचे कोणीच नाही. त्यात गरोदर. सुपे (ता. पारनेर) येथील "टोल'नाक्‍यावर अचानक खासगी बस बंद पडली नि त्याच वेळी तिला प्रसववेदना सुरू झाल्या. तीव्र वेदनांनी ती कळवळू लागली. काय करावे, कोणालाच काही समजेना... 

अकोल्याला निघाली होती

पुण्याहून गावी अकोल्याकडे काल (रविवारी) गरोदर महिला खासगी बसने निघाली होती. अंगमेहनतीचे काम करणारी ती जवळ कसले आलेत जास्तीचे पैसे. पती अगोदरच गावी गेल्याने, ती एकटीच प्रवास करीत होती. दुर्दैवाने नगर-पुणे महामार्गावर सुपे "टोल'नाक्‍यावर बस अचानक बंद पडली.

बाळंतकळा सुरू झाल्या

त्याच वेळी महिलेच्या पोटात दुखू लागले. प्रसववेदना सुरू झाल्या. पोटातील कळा वाढल्या. सगळे प्रवासी भांबावून गेले. काय करावे, काहीच सुचेना. अखेर त्याच बसमधून प्रवास करणाऱ्या, भोसरी येथून अकोल्याला निघालेल्या मोशी येथील सोनाली कवडे व पूनम राऊत पुढे सरसावल्या. 

प्रवासीच झाल्या दायी

कोणतेच साहित्य सोबत नसल्याने त्यांचीही अडचण झाली. प्रयत्नांची शिकस्त करीत त्यांनी सुखरूप बाळंतपण केले. त्या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. सुखरूप बाळंतपण झाल्यावर सगळ्यांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. 

त्या महिलांनीच "108' रुग्णवाहिकेला फोन केला. डॉ. विलास काळे तातडीने रुग्णवाहिका घेऊन हजर झाले. त्यांनी पुढील उपचार सुरू केले. बाळाची नाळ कापून सुटका केली. बाकी सेवाशुश्रूषा केल्यावर बाळ व बाळंतीण रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी नगर येथील शासकीय रुग्णालयात आणले.

वेळेवर मदत मिळाल्याने त्या मातेची सुखरूप प्रसूती झाली. मदत करणाऱ्या महिला, डॉ. काळे व सहप्रवाशांचे आभार कसे मानावेत, हे त्या मातेला कळत नव्हते. बाळ व बाळंतीण सुखरूप असल्याने सर्वांनीच आनंद व्यक्त केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Female delivery from Akole gets delivery in ST