मैदानावरची कुस्ती बंद; मल्लांच्या खुराकाचा प्रश्न

बाजीराव घोडे-पाटील
Thursday, 31 December 2020

लाल मातीतील रांगडा खेळ म्हणजे कुस्ती मात्र कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग व लॉकडाऊन मुळे गेल्या आठ-नऊ महिन्यापासून कुस्ती मैदाने बंद असून मैदानावरती अवलंबून असणाऱ्या मल्लांचा गेला सिजन पूर्णपणे वाया गेला आहे.

कोकरुड : लाल मातीतील रांगडा खेळ म्हणजे कुस्ती मात्र कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग व लॉकडाऊन मुळे गेल्या आठ-नऊ महिन्यापासून कुस्ती मैदाने बंद असून मैदानावरती अवलंबून असणाऱ्या मल्लांचा गेला सिजन पूर्णपणे वाया गेला आहे. महाराष्ट्रात अक्षय तृतीया व दत्त जयंतीपासून यात्रांचा सिजन सुरू होतो. आणि या यात्रेतील कुस्ती मैदानावरती पैलवान मंडळींचा आर्थिक दिनक्रम अवलंबून असतो. गेल्या नऊ महिन्यापासून बंद असलेले कुस्ती आखाडे दीर्घ प्रतीक्षेनंतर शासनाच्या नियमा नुसार पुन्हा सुरू झाले आहेत. 

पैलवानांची कसरत सुरू होऊन नव्या जोमाने लाल मातीत उतरले असून शड्डूचा आवाज पुन्हा घुमू लागला आहे. परंतु हा शड्डू कुस्ती मैदानात कधी घुमणार या प्रतिक्षेत महाराष्ट्रातील मल्ल, वस्ताद व कुस्ती शौकीन आहेत. कोरोनाचा वाढता प्राधुरभाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार कडून अनेक कठोर निर्णय घेण्यात आले. अनेक गोष्टी बंद कराव्या लागल्या यामध्ये "महाराष्ट्रातील गावोगावी यात्रा मधून होणारी कुस्ती मैदाने 15 मार्च पासून बंद करण्यात आली. अजूनही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तवली जात असून उरूस, यात्रा भरवण्यास बंदी कायम असून. मैदानेही होणार नाहीत. 

मैदानावरची कुस्ती बंद असल्याने पैलवान मंडळी वरती संक्रातीची वेळ आली आहे. महाराष्ट्रात गावोगावी होणाऱ्या ग्रामदेवतांच्या यात्रेला कुस्ती मैदानाशिवाय रंग चढत नाही. अनेक यात्रामध्ये "कुस्ती" मैदानांचे आयोजन करण्यात येते, परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे मैदाने होणार नसल्यामुळे कुस्ती वरती आवलंबून असणाऱ्या अनेक पैलवानांचा उदरनिर्वाह व खुराकाचा प्रश्न गंभीर बनला आहे. गावोगावी भरणाऱ्या ग्रामदैवतांच्या यात्रा हेच पैलवान मंडळींच्या आर्थिक उत्पनाचे सध्याचे तरी एकमेव साधन आहे. 

शासनाने कुस्ती आखाडे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. पैलवान मंडळींनी पुन्हा जोमाने कसारतीची तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रातील अनेक नामवंत मल्ल कुस्ती मैदाने सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मैदाने आयोजकांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन प्रशासनाशी चर्चा करून नवीन वर्षाव कुस्ती मैदाने सुरू करावी. 
- राहुल जाधव, वस्ताद, कुस्ती मल्लविद्या केंद्र शेडगेवाडी. 

कुस्ती मैदानाची परंपरा- 
जिल्ह्यातील कुंडल, पलूस, बांबवडे, सांगलीसह सर्वच तालुक्‍यात पारंपारिक कुस्ती मैदानाचे आयोजन केले जाते. तसेच अनेक जत्रा, यात्रा, उरूसानिमित्त कुस्ती मैदान भरवले जाते. तेथे लाखाच्या व दोन लाखाच्या प्रथम क्रमांकाच्या कुस्त्या लावल्या जातात. यंदाच्या वर्षात ही मैदाने भरली नाहीत. परंतू नववर्षात या मैदानांची कुस्ती शौकिनांना प्रतिक्षा असेल. 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Off-field wrestling; The question of the diet of the wrestlers