अंत्यसंस्कारांसाठी पंधरा तासांची "प्रतीक्षा यातना'! ; कर्मचाऱ्यांवरही काम लादलेले... कुठे चाललाय प्रकार वाचा

जयसिंग कुंभार
Friday, 11 September 2020

रोज तीस पस्तीस कोरोना रुग्णांचा मृत्यू. त्याचं पार्थिव सील होऊन अंत्यसंस्कारासाठी मिळेपर्यंत दोन तास जातात. पुन्हा अंत्यसंस्कारासाठी मोठी प्रतिक्षा यादी....

सांगली : रोज तीस पस्तीस कोरोना रुग्णांचा मृत्यू. त्याचं पार्थिव सील होऊन अंत्यसंस्कारासाठी मिळेपर्यंत दोन तास जातात. पुन्हा अंत्यसंस्कारासाठी मोठी प्रतिक्षा यादी. तिथंही रांग. एकावेळी पाच-सहाच पार्थिवांवर एकावेळी अंत्यसंस्काराची क्षमता. मग अग्नी शांत होईपर्यंत पुन्हा प्रतिक्षा... यात रोज किमान दहा ते पंधरा तासाचा अवधी लोटल्यानंतर अंत्यसंस्कार होत आहे. 

ज्यांच्या घरातील व्यक्ती जाते तेच या यातनांना सध्या सामोरे जात आहेत. गेले महिना दिड महिना शेकडो कुटुंबांच्या वाट्याला हे दुःख आले आहे. या मागची कारणे अनेक. त्यातलं पहिलं कारण अंत्यसंस्काराचे काम करणारे महापालिकेचे बदली आणि मानधनावरील कर्मचारी आहेत. त्यांचे हे कामच मुळी नाही. ते त्यांच्यावर लादलेले. सरणाच्या धगीला सतत सामारे गेल्याने अनेक कर्मचारी आजारी पडत आहेत. त्यामुळे कर्मचारी मिळणे मुश्‍किल झाले आहे.

मात्र पोटाची धग शमवण्यासाठी ही मंडळी ही धग सहन करीत काम करीत आहेत. हे काम महापालिकेवर तसे अतिरिक्तच. कारण जिल्हा आणि परजिल्ह्यातील मृतांचे काम महापालिकेची यंत्रणा करीत आहे. त्यासाठी अतिरिक्त यंत्रणा उभी करायला हवी. कालच्या आंदोलनानंतर या कामाचा ठेका देण्यात आला. 

वस्तुतः सर्व जिल्हाभरातील कोराना रुग्णांवर मिरजेतच अंत्यसंस्कार केल्याने मृतांच्या नातलगांना उत्तरकार्य किंवा अन्य धार्मिक विधीही करता येत नाहीत. त्यामुळे ही पार्थिव योग्य दक्षता घेऊन त्या गावात किंवा त्या गावच्या तालुक्‍याच्या ठिकाणी केल्यास माणुसकीच्या दृष्टीनेही योग्य ठरेल. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने आवश्‍यक त्या परवानगी देऊन ठेकेदारांच्या माध्यमातूनच अंत्यसंस्काराची सोय करणे गरजेचे आहे. 

डिझेल दाहिनी सुरु करा 
मिरज कृष्णाघाटावरील डिझेल दाहिनी सध्या बंद आहे. सध्याची परिस्थिती विचारात घेऊन ती दुरुस्त करून ती फक्त कोविड पार्थिवांसाठीच उपलब्ध करून दिली जाऊ शकते. रोज दर तासाला एक याप्रमाणे तिथेही अंत्यसंस्काराची सोय होऊ शकते असे मत डॉ.महेशकुमार कांबळे यांनी व्यक्त केले. 

काम सक्तीने करवून घेणे अन्यायी
बदली आणि मानधनावरील सफाई कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्काराचे काम सक्तीने करवून घेणे अन्यायी आहे. यासाठी वेगळा ठेका द्यावा ही मागणी आंदोलनानंतरच मान्य झाली. आता ठेकेदारानेही त्यांच्या कर्मचाऱ्यांना योग्य विश्रांती देऊन काम करवून घ्यावे. त्यांच्याही आरोग्याची काळजी घेतली जावी. 
- डॉ. महेशकुमार कांबळे, अध्यक्ष, महापालिका सफाई कर्मचारी संघटना 

माणुसकीच्या भावनेतून निर्णय घ्या
पार्थिव ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार आपआपल्या गावी करण्यास जे लोक तयार असतील त्यांना मुभा द्यावी. तेही योग्य दक्षता घेऊन ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांकडून थेट स्मशानभुमीत पार्थिव नेऊन अंत्यसंस्कार केले जावेत. निदान अंत्यसंस्कारानंतर तरी अन्य धार्मिक विधी नातलगांना करता येतील. माणुसकीच्या भावनेतून धार्मिक भावनांचा आदर करून प्रशासनाने हा निर्णय यापुढे तरी घ्यावा. 
- शेखर माने, शिवसेना नेते 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fifteen hours waiting for the funeral in Miraj