सदाभाऊंनी लिहलाय कोरोनामुक्त होण्याचा लढा 

sadabhau khot
sadabhau khot

18 ऑगस्टला अंगात थोडी कणकण आणि थंडी वाजू लागली. तसा मी सावध झालो.घरातील लहान लेकरांना मी स्वत: होऊन लांब ठेवले.माझं हे वागणं बघुन आईनं ओळखायचं ते ओळखलं.ती वटवटू लागली.कुठलीही माणसं जमा करून बसतोस.दुनियाभर फिरतोस.गप्प घरात बस.बाहेर काय चाललंय बघतोस नव्ह.किरकोळ कणकण आहे.तू काळजी करू नकोस म्हणून मी तीची समजूत काढली.तरीही कोणी माझ्या जवळ येवू नका असं सांगितलं.साशंक मनाने मी माझ्या कडे बघत होतो.सार्या जगाला भीती घालणारा कोरोना माझ्या जवळ आलाय की काय? तशी मला चाहूल लागली होती.सार अंग भरून आलेलं, डोकं जड झाले होते.श्वास घेताना जडपणा जाणवतं होता.नेहमीचा फ्लू असेल म्हणून एक मन मनातील शंका कुशंका उडवून लावत होते.कणकण जाणवतं असतानाही तारखेला इस्लामपुरातील समाजकल्याण वसतीगृहात सुरू असलेल्या कोव्हीड सेंटरला माझ्या आमदार फंडातून बेड इत्यादी वैद्यकीय साधने देण्याचा कार्यक्रम झाला. त्यात सहभागी झालो. 20 ऑगस्टला झुमवर आवश्‍यक सेवा कायदा सुधारणा बाबत बैठकीत सहभागी होताना थंडी फारच लागत होती. मिटींग संपल्यानंतर ऍड. बोरुलकरांचा फोन आला, की काही काळ तुम्ही घरी थांबून विश्रांती घ्या. 
सायंकाळी फारच थंडी वाजू लागली तसं थोरला मुलगा सुनील डॉक्‍टरांना बोलवू म्हणू लागला. मी "उद्या बघू', म्हणून सुमनला पाणी गरम करायला सांगून वाफ घेतली. श्वास थोडा मोकळा झाला. सकाळी परत वाफ घेतली. आई म्हणाली, ""आधी डॉक्‍टरकडं जा.'' डॉ. राणोजी शिंदे यांना फोन करून करून दवाखान्यात जाऊन कोव्हीडची टेस्ट करून घरी आलो. कणकण आणि श्वास घ्यायला त्रास जाणवत होता. रयत क्रांती संघटनेने मार्केट कमिटीच्या लाक्षणिक संप विरोधात प्रतिआंदोलन जाहीर केले होते. सगळ्या कार्यकर्त्यांना निरोप दिला. बॅनर छापायला दिले. 21 ऑगस्टला दुपारी तीन तास सांगलीच्या विष्णुअण्णा पाटील मार्केट कमिटीसमोर कार्यकर्त्यां समवेत निदर्शने केली. आता मला गळून गेल्यासारखं वाटू लागले. मी दोन दिवस स्वत: क्वारंटाईन झालो. रिपोर्ट यायच्या आधीच मी माझ्या खोलीत इतरांना न येण्याची ताकीद दिली. 23 ऑगस्टला रयत क्रांती संघटनेचे नेते प्रा. सुहास पाटील हे त्यांच्या चिरंजीवासमवेत माढ्याहून भेटायला आले होते. त्यांच्याबरोबर आणखी दोघे कार्यकर्ते होते. आम्ही सर्वानी दुपारी एकत्र जेवण केले. काम संपवून ते माढ्याला निघून गेले. 24 तारखेला दुपारी शिराळ्याला जावून तेथे माझ्या आमदार फंडातून तयार झालेल्या फिरत्या कोव्हीड सेंटरचे उद्घाटन केले. यावेळी सम्राटबाबा महाडिक, रणधीर नाईक, सुखदेव पाटील, सत्यजीत कदम आदी कार्यकर्ते उपस्थित होते. सोमवारचा उपवास असल्याने सत्यजीत कदम यांच्या घरी जाऊन फराळ केला. 25 तारखेला दुपारी रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांची झूमवर बैठक सुरू असताना मोहन चव्हाण साहेबांचा फोन आला, की भाऊ आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. चांगल्या दवाखान्यात ऍडमिट व्हा. 
अखेरीस जगात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाने मला पकडले होते. परत मिटींगमधे येवून बसलो. मिटींग संपल्यानंतर वाफ घेतली. श्वास मोकळा झाला. मला आता एक काळजी लागली होती, गेला आठवडाभर माझ्या संपर्कात आलेल्यांना सावध करणे गरजेचे होते. मी माझ्या फेसबुक पेजवर लिहिले. थोड्यावेळात पहिला फोन सुहास पाटील यांचा आला. परवा तुमच्या जवळच बसलो होतो. आम्हाला तपासणी करायला लागेल काय? आता मी स्वत:च कोरोनाविरोधात चार हात करीत होतो. गेला आठवडाभर तर कोरोना माझ्या शरीरात मुक्कामाला येवून लक्षणे दाखवत होता. मी अनुभवी रूग्णाप्रमाणे पाटील सरांना सल्ला दिला. काही काळजी करू नका. गरम पाण्याने वाफ घ्या. चहाचा काढा घ्या. प्राणायम करा. ते आणि त्यांचा मुलगा क्वारंटाईन झाले होते. ते तसे घाबरले होते. साहजिकच होते. साऱ्या जगात या रोगावर अजून औषध न सापडल्याने भीतीची भावना पसरली आहे. मी त्यांना दररोज फोन करून धीर देत होतो. घरी सर्वजण काळजीत होते. डॉक्‍टरांच्या सल्ल्याने मी औषध घ्यायला सुरुवात केली. या दहा-बारा दिवसातील अनुभव मी आपणासमोर ठेवत आहे. 
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तरी अजिबात घाबरून जाऊ नका. घरातील लोकांनी रुग्णाजवळ जात असताना तोंडाला मास्क लावणे व अंतर ठेवून मदत करणे. रुग्णाने घरी मास्क लावून राहणे. 
मी स्वत:ला एका खोलीत बंदीस्त करून घेतले. सकाळी सात वाजता उठून मी फ्रेश व्हायचो. सुमन ग्लास गरम पाणी आणून देई. त्यानंतर गुळाचा चहा. त्यात चहा पत्ती, पेरुचे पान, गवती चहा, तुळशीची पाने, हळद, लवंग, जिरे, आले घालून चहा प्यायचा. हा काढा कम चहा मी दिवसातून दोन वेळा घेत होतो. पाण्याची वाफ दिवसातून तीन वेळा घेत होतो. या काळात अनेक हितचिंतक, कार्यकर्ते, लोक प्रतिनिधी यांचे फोन येत होते. माझे मनोधैर्य किंचीतही खचलेले नव्हते. सायंकाळी ओसरीमधे चालण्याचा व्यायाम नियमितपणे करीत होतो. ज्वारीची भाकरी, कडधान्य, डाळींब, मोसंबी, सफरचंद अशा फळांचा रस घेत होतो. अनेक कार्यकर्ते अंडी आणि मांसाहार खाण्याबाबत सूचना देत होते. परंतु घरामधे गणपती असल्यामुळे मी मांसाहार केला नाही. 
25 तारखेला मी मरळनाथपूरला गेलो होतो. तब्येत बरी नसल्याने गावात न जाता गावाबाहेर अंकुश मिस्त्री यांच्या घरी मित्र परिवारासह बसलो होतो. राजू खोत, कांता धुमाळ, शिवाजी धुमाळ,चाकू उर्फ महेश खोत यांच्या सह सायंकाळी जेवण केले होते. तेही घाबरून क्वारंटाईन झाले होते. त्यांचाही दररोज फोन यायचा. जे जे गेल्या आठ दहा दिवसांत माझ्या संपर्कात आले होते, ते दररोज फोन करून माझ्या तब्येतीची विचारपूस करायचे.त्यांना धीर द्यायची जबाबदारी पार पाडली. विशेषत: महेश खोत (चाकू) दिवसातून ते वेळा फोन करायचा.एक दिवस त्याची फिरकी घेतली.एक दिवस त्याला मी जास्त बरं नाही असं सांगितलं. गडी घाबरून म्हणाला बायका पोरांना गावाकड पाठवून दिलय.आता त्यांना लवकर आणत नाही.त्याने इतर मित्रांना ही सांगितले की भाऊंची तब्येत खूपच बिघडली आहे.तसे त्यांचेही फोन यायला लागले. तसं काही झाले नाही म्हणून सांगितल्यावर त्यांना हायसे वाटले. यातील गमतीचा भाग सोडला तरी या रोगाविषयी समाजात दहशत निर्माण झाली आहे हेही जाणवले. या दहा दिवसांत माझी खोली मी स्वत: साफ केली. माझे कपडेही मीच धुतले. शेजारचे लोक घाबरून आपापल्या घरात बंदिस्त झाले होते. माझी पत्नी, सुना आणि नातवंडे रस्त्यावर फिरायला गेले की लोक आल्या पावली माघारी फिरायचे. आजूबाजूचा सारा परिसर या दहा दिवसांत सामसूम झाला होता. सांगली जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत होती. बेड मिळत नाही म्हणून दररोज अनेक फोन यायचे. अधिकाऱ्यांना फोन लावून त्यांचे काम करीत होतो. एकंदरीत चित्र चिंताजनक असले तरी आत्मविश्वासाने या रोगाला पळवून लावता येते हा अनुभव ही मी घेतला. सातव्या दिवशी मी टेस्ट करून घेतली. ती निगेटिव्ह आली. तरीही मी आणखी चार दिवस स्वत:ला क्वारंटाईन करून घेतले आहे.कोरोनाला हरवायचेच ही माझी जिद्द सफल झाली. पण या काळात रुग्णांची वाढती संख्या, त्यांना दवाखान्यात जागा आणि सुविधा न मिळणे, त्यासाठी त्यांच्या नातेवाईकांची होणारी तगमग पाहून ही लढाई खूप अवघड आहे हे जाणवले. एकीकडे स्वत:ला बरं आहे याचे समाधान वाटत असतानाच बाहेर लोकांचे चाललेले हाल बघून मनात खिन्नता दाटून येते आहे. माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की काळजी पूर्वक रहा. या रोगावर मात करता येते. घाबरून जावू नका. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com