
इस्लामपूर- वाळवा तालुक्यातील महसूलमधील मंडल अधिकारी व तलाठ्यांत तहसील कार्यालयात कपडे फाटेपर्यंत झालेल्या मारामारीच्या प्रकारामुळे महसूलची बेअब्रू झाली. उरुण-इस्लामपूर व इस्लामपूर या चावड्यांत तलाठी व मंडलाधिकारी म्हणून नियुक्ती मिळण्यासाठी स्पर्धा असते. त्यावरून सुरू झालेली धुसफूसीचे पर्यवसान मारामारीत झाल्याने चावडीतील घडामोडींचे खुमासदार किस्से महसूलमध्ये चर्चिले जात आहेत.
इस्लामपूर (सांगली) - वाळवा तालुक्यातील महसूलमधील मंडल अधिकारी व तलाठ्यांत तहसील कार्यालयात कपडे फाटेपर्यंत झालेल्या मारामारीच्या प्रकारामुळे महसूलची बेअब्रू झाली. उरुण-इस्लामपूर व इस्लामपूर या चावड्यांत तलाठी व मंडलाधिकारी म्हणून नियुक्ती मिळण्यासाठी स्पर्धा असते. त्यावरून सुरू झालेली धुसफूसीचे पर्यवसान मारामारीत झाल्याने चावडीतील घडामोडींचे खुमासदार किस्से महसूलमध्ये चर्चिले जात आहेत.
तालुक्याचा कारभार इस्लामपुरातून चालतो. विस्तारवाढीमुळे शहरात दोन तलाठी सजे निर्माण करण्यात आले. शहर व भोवतालच्या उपनगरांचे वाढते प्रमाण व तालुक्यातील अनेक लोकांना इस्लामपुरात प्लॉट, घर असावे असे वाटत असल्याने दोन्ही सजात कामकाजाची मोठी उलाढाल असते. या सजात काम करणारा तलाठी इथे नेमणूक मिळण्यासाठी अनेक उचापती करतो. अनेकांच्या हातावर वजन ठेवतो. तशी परंपराच बनल्याचे सांगितले जाते. असेच वजन ठेवून नेमणूक मिळाल्यावर जास्तीत काम करण्यावर तलाठ्याचा भर असतो. मिळकतीतून अनेकांना वाटकेरी करून घ्यावे लागते. तलाठी, मंडलाधिकारी व तहसील कार्यालयातील काम वेगळे. तसेच साधारण कामकाजाचे चित्र इस्लामपूर व उरुण-इस्लामपूर चावडीत दिसते.
जुना कोणताही सातबारा, खातेउतारा काढा त्यात शेकडो नावे दिसतात. किचकट प्रकरण आहे, अण्णासाहेबांशी बोलून तोडगा काढावा लागेल, असे उत्तर मिळते. संबंधित व्यक्तीचे पुढे आठ-दहा हेलपाटे मारल्यावर बिदागीचा आकडा सांगितला जातो. इकडे तिकडे करून अण्णासाहेब ते तहसील कार्यालयापर्यंत कोणाला किती द्यावे लागतात याचा आकडा झिरो तलाठी अथवा एजंट सांगतो. असे हजारो रुपये दोन्ही सजात उकळले जातात. पैशांवरू अनेकवेळा झिरो तलाठी व एजंटांत वाद होतो. मंगळवारी अशाच वादातून अण्णासाहेब व मंडल अधिकाऱ्यांत मारामारी झाली. त्यामुळे प्रकरण चव्हाट्यावर आले.
तालुक्यातील एका तलाठ्यांनी बोलकी प्रतिक्रिया दिली. "लाखो रुपये देऊन तिथे गेलेल्यांना दुसरे काही सुचत नाही. किरकोळ व नियमानुसार काम असले तरी मोबदला घेण्यास कर्मचारी कचरत नाहीत. काहीवेळी अधिकाऱ्यांचाही पाठिंबा असतो. गेस्टहाऊसपासून शहरातील नामांकित होटेलची बिले, अधिकाऱ्यांच्या फॉरेन ट्रीप, पै-पाहुण्यांची बडदास्त अण्णासाहेब व मंडलाधिकाऱ्यांना ठेवावी लागते. "मला बिदागी का कमी?', यावरून वाद विकोपाला गेल्याची चर्चा आहे. त्याची चर्चा महसूल विभाग व तालुक्यात दबक्या आवाजात सुरू आहे. संबंधित यंत्रणेने सखोल चौकशी करून महसूलमधील वरकमाई थांबवण्यासाठी हालचाली केल्या पाहिजेत, अशी मागणी आहे.
"काम काय आहे, त्यांना भेटा...'
दोन्ही चावडीत तलाठी कमी आणि झिरो तलाठ्यांचा (एजंट) वरचष्मा जास्त असतो. "अण्णासाहेब बाहेर गेलेत, काय काम आहे', असे संबंधित एजंट अथवा झिरो तलाठी कामानिमीत्त गेलेल्यांना चावडीत प्रवेश करताच विचारतो. काम काय आहे, हे सांगताच तिथे बसलेल्या दुसऱ्या व्यक्तीकडे बोट दाखवून "यांना भेटा' असे म्हणून कामाला प्रारंभ केला जातो.
तहसीलमध्ये झालेला प्रकार गंभीर आहे. चौकशी करून संबंधितांवर कारवाई होईल. चावडीत झिरो तलाठी अथवा एजंट दिसल्यास त्यांच्यावरसुद्धा कारवाई करण्यात येईल. लोकांची कामे वेळेत व बिनत्रासाची होण्यासाठी महसूल प्रशासन बांधील आहे.
- नागेश पाटील, उपविभागीय अधिकारी, वाळवा