हिंमत असेल तर खंडणीचे गुन्हे दाखल कराच; कुणी दिले आव्हान आणि का... वाचा

जयसिंग कुंभार
Tuesday, 14 July 2020

हिंमत असेल तर जरुर आमच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करावेत. मात्र आयुक्तांची ही भूमिका लोकसेवकाला शोभणारी नाही अशी, टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, सरचिटणीस आशिष कोरी, संदीप टेंगलेयांनी आज केली. 

सांगली : वाहनांचे खोटे क्रमांक टाकून बीले उकळणे हाच महापालिका प्रशासनाचा हेतू असल्याचा आमचा आरोप आहे. आयुक्तांच्या खुलाशाने तेच सिध्द झाले आहे. हिंमत असेल तर जरुर आमच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करावेत. मात्र आयुक्तांची ही भूमिका लोकसेवकाला शोभणारी नाही अशी, टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, सरचिटणीस आशिष कोरी, संदीप टेंगलेयांनी आज केली. 

आयुक्‍त नितीन कापडणीस यांनी त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांवर रविवारी गुन्हे दाखल करणार असा इशारा दिला होता. यावर आज मनसेच्यावतीन पत्रकार परिषद घेवून पुढील प्रमाणे निवेदन करण्यात आले आहे. श्री. सावंत यांनी म्हटले आहे की, गतवर्षीच्या महापूर काळात केलेल्या कामाची कोट्यवधींची बीले खर्ची टाकण्यात आली आहेत. या सर्व कामांबद्दल माहिती अधिकारात प्राप्त झालेल्या कागदपत्रांच्या आधारे मनसेच्यावतीने महापालिका प्रशासनावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. त्यावर आयुक्तांनी खुलासा करताना वापरलेले जेसीबी हजर करीत खुलासा केला होता. 

आयुक्त नजरचुकीने जेसीबी वाहनांचे क्रमांक चुकीचे पडल्याचे सांगतात. ते खरे नाही. हेतूपुर्वक वेगवेगळे क्रमांक दाखवून बीले टाकण्यात आली आहेत. चुक एकदा होऊ शकते. तब्बल 12 वेळा होऊ शकत नाही. आम्ही आत्ता फक्त जेसीबी वाहनांचे क्रमांक चुकीचे असल्याचे सिध्द केले आहे. अजूनही ट्रॅक्‍टरसह अन्य अनेक वाहनांबाबतही तेच असणार आहे. तेव्हाही ते असा दावा करणार का?

महापूरकाळात आम्ही पदरमोड करून आमच्या परीने मदतकार्य केले आहे. पगारी नोकर म्हणून नव्हे. तुम्ही केलेल्या कामांची जाहिरातबाजी आणि स्टंटबाजी न करता झालेल्या चुका मान्य करा. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करा. आम्ही न्यायालयात जाणार आहोतच. पण आम्हाला गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊ नका. ही लोकसेवकाची भाषा नाही. हिंमत असेल तर ते जरुर करा. आम्ही भ्रष्टाचाराचा पंचनामा करीतच राहू.'' 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: file a case of ransom;. MNS challenges the commissioner of Sangali