सीमाप्रश्‍न खटला ; सलग सुनावणीची गरज...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या दाव्याची सुनावणी लवकरात लवकर व सलग व्हावी, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्याचे महाभियोक्‍ता आशुतोष कुंभकोणी यांच्याकडे पाठपुरावा करावा.

कोल्हापूर - महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या दाव्याची सुनावणी लवकरात लवकर व सलग व्हावी, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्याचे महाभियोक्‍ता आशुतोष कुंभकोणी यांच्याकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याकडे केली.

दावा बोर्डवर आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक

विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री. पवार गुरुवारी कोल्हापुरात आले होते. यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन सीमाप्रश्‍नाबाबत चर्चा केली. सीमाप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेला दावा अद्याप बोर्डवर आलेला नाही. या खटल्यातील महाराष्ट्राचे वकील ॲड. हरिष साळवे यांनी हा दावा बोर्डवर आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. दावा बोर्डवर आल्यानंतर त्याची सलग सुनावणीही होण्याची गरज आहे. त्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे व श्री. कुंभकोणी यांच्यामार्फत प्रयत्न करण्याची गरज आहे. याकामी आपण उभयतांकडे पाठपुरावा करावा, असे या शिष्टमंडळाने श्री. पवार यांना सांगितले. त्याला श्री. पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या शिष्टमंडळात मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, खजिनदार प्रकाश मरगाळे, माजी नगरसेवक विजय पाटील, सुनील आनंदाचे, महेश जुवेकर यांचा समावेश होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Filed in Supreme Court Maharashtra-Karnataka border question