अखेर आमराईतील मिनी ट्रेनला ब्रेक; पर्यावरणप्रेमींच्या विरोधापुढे प्रशासन नमले

Finally the brakes on the mini train in Amrai; Administration in the face of opposition from environmentalists
Finally the brakes on the mini train in Amrai; Administration in the face of opposition from environmentalists
Updated on

सांगली : शहराचं फुप्फुस म्हणून ओळख असलेल्या आमराईत मिनी ट्रेन बसवण्याचा घाट पर्यावरणप्रेमींच्या विरोधानंतर रद्द केला आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी येत्या 23 फेब्रुवारीला बैठक बोलवली होती. तथापि तत्पूर्वीच महापालिकेने शुद्धीपत्रक प्रसिद्ध करीत आता ही मिनी ट्रेन आमराईऐवजी विश्रामबाग येथील नेमीनाथनगरच्या मैदानाची जागा निश्‍चित केली आहे. आजच निविदा उघडण्यात येणार होत्या. त्याचे काय झाले याबाबत स्पष्टता नाही. 

आमराईतील शांतता कायम रहावी आणि इथे मिनी ट्रेन नको अशी स्पष्ट भूमिका घेत पर्यावरण प्रेमी नागरिकांनी तीव्र विरोध केला होता. प्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रार केली होती. पापा पाटील, डॉ. रवींद्र व्होरा, डॉ. मनोज पाटील, शेखर माने यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबतची रितसर निवेदन दिले होते. हा प्रस्ताव म्हणजे सुमारे चाळीस वर्षांपूर्वी राज्य शासन व तत्कालीन नगरपालिका यांच्यात आमराईचे हस्तांतरण करतेवेळी झालेल्या कराराचे सरळ सरळ उल्लंघनच असल्याचे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी या मागणीची दखल घेत बैठक बोलवली होती. तथापि प्रशासनाच्या चूक लक्षात आली असावी. शहर अभियंता संजय देसाई यांनी शुद्धीपत्रक प्रसिद्धीस देऊन ही मिनी ट्रेन नेमीनाथनगरातील मैदानावर उभी करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे. 

याबाबत डॉ.रवींद्र व्होरा म्हणाले,""महापालिकेच्या या निर्णयामुळे आमराईप्रेमी नागरिकांनी पहिली लढाई जिंकली आहे. मात्र आमराईचे जतन व्हावे. तिथले पर्यावरण निकोप रहावे यासाठी ठोस असे धोरण ठरवले पाहिजे. 23 फेब्रुवारीच्या बैठकीस जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यावरण प्रेमी नागरिकांची व तज्ज्ञांना निमंत्रित करावे. या बैठकीत आमराई हस्तांतरण कराराप्रमाणे समिती स्थापन करावी. या समितीच्या माध्यमातूनच यापुढे आमराईचे निर्णय व्हावेत.'' 

शिवसेना नेते शेखर माने म्हणाले,""प्रशासन देर आये दुरुस्त आये. काहींच्या ठेकेदारीसाठी शहरातील उद्याने नाहीत याचे भान आधी सर्वांनी ठेवले पाहिजे. नेमीनाथनगर परिसरातील नागरिकांची मते विचारात घेऊन तेथील नियोजित मिनी ट्रेनबाबत पुढचा निर्णय व्हावा. घाईगडबडीने कोणताही निर्णय होऊ नये.'' 

"सकाळ'चा झटका 
आमराईच्या सौंदर्याला बाधा नको अशी स्पष्ट भूमिका घेत "सकाळ'ने प्रशासनाच्या मिनी ट्रेनच्या प्रस्ताविरोधात जनजागृती केली होती. पर्यावरणप्रेमींच्या मदतीने प्रतापसिंह उद्यानातील कॅन्टीनचा घाट उधळल्यानंतर आता आमराईच्या विद्रुपीकरण रोखण्यातही यश आले आहे. "सकाळ'ने याबाबत सातत्याने बातम्या देत जनजागृती केली होती.

संपादन : युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com