अखेर "या' रस्त्याच्या कामाला मिळाला मुहूर्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 जानेवारी 2020

तोफखाना पोलिस ठाणे ते भिस्त महालापर्यंत रस्त्याचे काम होणार आहे. ठेकेदाराला दोन महिन्यांपूर्वीच कार्यारंभ आदेश दिला आहे. मात्र, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत. ती काढण्याची मागणी नगरसेविका सोना तायगा शिंदे यांनी आयुक्‍तांकडे केली होती.

नगर : महापालिकेच्या तीन कोटी 48 लाख रुपयांच्या विकास आराखड्यातून तोफखाना पोलिस ठाणे ते भिस्त महाल रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सावेडी उपनगरातील हा सर्वांत महत्त्वाचा रस्ता आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. रस्त्याची जागानिश्‍चितीचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर अतिक्रमणे निश्‍चित करून त्यावर कारवाई केली जाणार आहे. निर्देशानुसार काम करण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्याची माहिती महापालिकेचे प्रभारी शहर अभियंता सुरेश इथापे यांनी दिली. 

जाणून घ्या- बापू समर्थकांचे ठरलं... 

तोफखाना पोलिस ठाणे ते भिस्त महालापर्यंत रस्त्याचे काम होणार आहे. ठेकेदाराला दोन महिन्यांपूर्वीच कार्यारंभ आदेश दिला आहे. मात्र, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत. ती काढण्याची मागणी नगरसेविका सोना तायगा शिंदे यांनी आयुक्‍तांकडे केली होती. त्यासाठी आंदोलनाचा इशाराही दिला होता. त्यानुसार या रस्त्याची जागा निश्‍चित करण्याचे काम सुरू झाले आहे. जागानिश्‍चितीचे काम अंतिम टप्प्यात आहे. जागा निश्‍चित होईल, तेथे काम सुरू करण्यात येत आहे. आठवडाभरापूर्वी या रस्त्याचे काम ठेकेदाराने सुरू केले आहे. 

स्थायी समितीची कामास मंजुरी

तोफखाना पोलिस ठाणे ते भिस्त महाल रस्त्याची दुरवस्था झाली आहे. दुभाजक तुटले असून, गोकुळनगर परिसरात हा रस्ता अतिशय खराब झाला आहे. महापालिकेच्या स्थायी समितीने रस्त्याच्या कामास मंजुरी दिली. त्यानुसार दोन महिन्यांपूर्वीच कार्यारंभ आदेश ठेकेदाराला देण्यात आला. तोफखाना पोलिस ठाणे ते भिस्तबाग चौकापर्यंत डांबरीकरण, तर भिस्तबाग चौकापासून महालापर्यंत रस्त्याचे कॉंक्रिटीकरण होणार आहे. 

अवश्‍य वाचा- समदेच बुचकाळ्यात : वहिनीसाहेबांना डायरेक्‍ट मंत्री व्हायचंय 

रस्त्याची मोजणी करून रस्त्यातील अतिक्रमणे हटविणे, रस्त्यातील मोठे वृक्ष, खांब हटविण्याबाबत संबंधित विभागांतर्फे कार्यवाही केली जाणार आहे. रस्त्याच्या खाली ड्रेनेजलाइन राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे. त्यासाठी जलवाहिन्या व ड्रेनेजलाइन रस्त्याच्या कडेने ठेवण्यात येणार आहेत. या कामामुळे तपोवन, वडगाव गुप्ता रस्ता, ढवणवस्ती आदी भागांतील नागरिकांना सावेडी उपनगरात येण्यासाठी चांगला रस्ता मिळेल. 

अशी असेल रस्त्याची रुंदी 

  • टीव्ही सेंटर ते गुलमोहर रस्ता कोपरा - 20 मीटर 
  • गुलमोहर रस्ता कोपरा ते भिस्तबाग चौक - 18 मीटर 
  • भिस्तबाग चौक ते भिस्त महाल - 15 मीटर 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finally the work of Bhistbagh road started marathi news